मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांना इनकम टॅक्सने (Income Tax) नोटीस पाठवली आहे. तब्बल 814 कोटी रुपयांची माहिती अनिल अंबानी यांनी लपवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. दोन परदेशी बँकांमध्ये जवळपास 814 कोटी रुपये त्यांनी ठेवल्याची माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी नोटीस इनकम टॅक्सकडून जारी करण्यात आली असून या रकमेवरील कर चुकवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता अनिल अंबानी आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीसीला काय उत्तर याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नेहमीच आघाडीवर असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे अनिल अंबानी हे भाऊ आहे. त्यांना इनकम टॅक्सने नोटीस पाठवल्यामुळे चर्चांनाही उधाण आलंय. आता या संपूर्ण प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई होते, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अनिल अंबानी यांनी जाणिवपूर्वक आयकर चुकवण्यासाठी परदेश बँकेतील खाती आणि मालमत्तेबाबतची माहिती लपवली, असा आरोप इनकम टॅक्सकडून करण्यात आला आहे. आता 31 ऑगस्टपर्यंत या नोटीसीला उत्तर देण्याची मुदत अनिल अंबानी यांना देण्यात आला आहे. दरम्यान, ही रक्कम काळा पैसा असल्याचा ठपका ठेवा त्यांच्यावर खटला चालवण्यात येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यात ते दोषी आढळल्यास 2015मधील काळा पैशांविरोधातील कलम 50 आणि 51 अन्वये त्यांना दंडासह 10 वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते.
अंबानी बहामास येथील इकाई डायमंड ट्रस्ट आणि अन्य एका नॉर्दर्न एटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड या कंपनीसोबत जोडलेले आहे. या कंपनीसोबत आलेली मिळकत आणि मालमत्ता ही अनिल अंबनींची असल्याचा आरोप आहे. काळ्या पैशांविरोधातील कायद्यानुसार अनिल अंबानी यांनी 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा नोटीसीत म्हटलंय. 814 कोटी पेक्षा अधिक रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेवरुन आता अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.