अनिल देशमुखांची चौकशी संपली; तब्बल 11 तास सीबीआयकडून झाडाझडती

| Updated on: Apr 14, 2021 | 9:41 PM

सचिन वाझे खंडणीप्रकरणी अखेर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी संपली आहे. (Anil Deshmukh Quizzed by CBI For 11 Hours in parambir singh Case)

अनिल देशमुखांची चौकशी संपली; तब्बल 11 तास सीबीआयकडून झाडाझडती
अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी
Follow us on

मुंबई: सचिन वाझे खंडणीप्रकरणी अखेर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी संपली आहे. सीबीआयने तब्बल 11 तास त्यांची चौकशी केली. यावेळी सीबीआयने त्यांना अनेक उलटसुलट प्रश्न विचारल्याचं सांगितलं जातं. मात्र, देशमुख यांनी यावर काहीही भाष्य न केल्याने देशमुख यांना नेमकं काय विचारलं गेलं? याबाबतचं गूढ वाढलं आहे. (Anil Deshmukh Quizzed by CBI For 11 Hours in parambir singh Case)

सीबीआयने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख आज सकाळी 10 वाजता सीबीआयच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी सीबीआयचे एसपी दर्जाचे अधिकारी अभिषेक दुलार आणि किरण एस यांच्याकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली. सांताक्रुझच्या कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी करण्यात आली. तब्बल 11 तास  ही चौकशी चालली. चौकशीसाठी सीबीआयने प्रश्नांची यादी तयार केली होती. त्यापूर्वी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरे, सिंग यांचं पत्रं आणि कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांच्या आधारे सीबीआयने ही प्रश्नावली तयार केली होती. त्यावरून देशमुख यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडण्यात आल्या. सीबीआयने अत्यंत कसून ही चौकशी केली. मात्र, या चौकशीचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. तसेच देशमुख यांना परत चौकशीसाठी बोलावण्यात आलं का? हे सुद्धा कळू शकलं नाही.

15 दिवसात अहवाल देणार?

दरम्यान, सीबीआयला या प्रकरणाचा तपास करून 15 दिवसात कोर्टाला अहवाल सादर करायचा आहे. सीबीआय कोर्टाला अहवाल सादर करणार की कोर्टाकडून आणखी अवधी वाढवून मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोर्टाचे आदेश

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री म्हणून निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देतानाच 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

आरोप काय?

निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते. (Anil Deshmukh Quizzed by CBI For 11 Hours in parambir singh Case)

 

संबंधित बातमी:

Anil Deshmukh:आगामी काळ अनिल देशमुखांसाठी कठीण असेल; भाजप नेत्याचे सूचक वक्तव्य

अनिल देशमुखांचा बचाव करण्यास असमर्थ ठरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरद पवार नाराज

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

(Anil Deshmukh Quizzed by CBI For 11 Hours in parambir singh Case)