मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट ईडीकडून जप्त करण्यात आलं आहे. साई रिसॉर्टसह 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आलीय. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी साई रिसॉर्ट विरोधात ही कारवाई आहे. साई रिसॉर्ट म्हणून परवानगी घेताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मालक म्हणून ओळख लपवली. जेव्हा रिसॉर्ट तक्रारी येऊ लागल्या तेव्हा परबांनी संबंधित मालमत्ता सदानंद कदम यांच्या नावे ट्रान्सफर केली, असा दावा ईडीच्या अधिकृत प्रेस रिलीजमध्ये करण्यात आलाय. ईडीच्या या दाव्यावर अनिल परब यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.
“मी अब्रुनुकसानीचा दावा केलेला आहे. ज्यावेळेला माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही हे सिद्ध होईल त्यावेळेला सगळ्यांनाच त्याची किंमत द्यावी लागेल”, असा इशारा अनिल परब यांनी दिला.
“याबाबतीत सगळे खुलासे पोलिसांकडे झालेले आहेत. तसेच ईडी आणि इनकम टॅक्सकडेदेखील याबाबतीत सर्व खुलासे झालेले आहेत. वर्ष – दोन वर्ष या प्रकरणाची चौकशी चालूय. आता त्यांनी जी संपत्ती जप्त केलीय ती कुठल्या कायद्याने आणि कुठल्या आधाराने त्याचा सर्व विचार संपत्तीचे मालक सदानंद मोरे करतील”, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.
“या सगळ्या गोष्टी ईडीने तपासलेल्या आहेत. ईडीची कारवाई बरोबर की चुकीची यासाठी न्यायालय आहे”, असं अनिल परब म्हणाले.
“भाजप नेते किरीट सोमय्या काय म्हणतात याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. कायदेशीर काय होतं आणि माझा त्याच्याशी काय संबंध आहे हा महत्त्वाचा विषय आहे. तो कोर्टात आम्ही सिद्ध करु”, असंदेखील अनिल परब म्हणाले.