मुंबई | 2 जानेवारी 2024 : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना डोरिन फर्नांडिस या वृद्ध महिलेला अखेर साडे आठ कोटी रुपये द्यावे लागले. या प्रकरणी पाठपुरावा करत असताना अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी सर्वप्रकार समजून घेतला होता. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअपवर ग्रुप बनवला होता. या ग्रुपमध्ये दमानिया होत्या, सुप्रिया सुळे होत्या, समीर भुजबळ होते, त्यांचे वकील आणि डोरिन फर्नांडिस यांच्यासह काही जण होते. या ग्रुमपध्ये सुप्रिया सुळे यांनी पैसे देण्याची विनंती केली होती. पण तरीही भुजबळ पैसे द्यायला तयार नव्हते, असं दमानिया यांनी सांगितलं. तसेच आपण या प्रकरणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो, त्यावेळी फडणवीसांचे बोल एकूण आपल्याला दु:ख वाटलं, अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी सांगितलं.
“जरांगे पाटलांच्या इश्यूमुळे त्यांना वाटलं असेल दबाव येईल. त्यामुळे त्यांनी ग्रुपवर मेसेज टाकला. आम्ही द्यायला तयार आहोत. पण ईडीने त्याच्यावर रजिस्ट्रीचा बॅन केला. ईडीने त्यांच्या सो कॉल्ड मालमत्ता जप्त केल्या होत्या. सो कॉल्ड यासाठी म्हणते कारण ते अजूनही तिथेच मजेत राहत आहेत. पण पेपरवर रजिस्ट्री बंद केल्या होत्या. रजिस्ट्री का बंद करतो तर थर्ड पार्टी इंट्रेस्ट क्रिएट करू नये म्हणून. मी त्यांना म्हटलं हे तुमचं 2003 पासूनचं देणं आहे. याची रजिस्ट्री बंद करण्याचा प्रश्नच नाही. म्हणून मी ईडी बरोबर चेक केलं. ते म्हणाले, हे फक्त थर्ड पार्टी ट्रान्सेक्शन पूरतं मर्यादित आहे. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हटलं तुम्ही पॉवर ऑफ अॅटर्नी डोरिनकडून घ्या आणि तिचे पैसे तिला द्या. नाही तर मी सोडणार नाही. त्यात परत त्यांचं पुढेमागे चाललं होतं”, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.
“त्यानंतर मी नोव्हेंबरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मेसेज पाठवला. सहा नोव्हेंबरला. मला तातडीची मिटिंग पाहिजे. त्यानंतर फर्नांडिस यांच्या पूर्ण कुटुंबाला घेऊन मी फडणवीस यांच्या घरी गेले. दाखवलं. अशी परिस्थिती आहे. अशा राजकारण्यांना तुम्ही मोठे करता. लुटणारे, लुबाडणारे असे राजकारणी, ज्यांचं राजकीय आयुष्य संपलं होतं, अशा लोकांना तुम्ही उभं करत आहात. म्हटलं काय बोलावं तुम्हाला. अजून लाखो लोकांना ते लुटतील. ते म्हणाले, नाही नाही… जे झालं ते चुकीचं झालं. मी समीरशी बोलतो. खरं तर ते ऐकून थोडं दु:ख झालं होतं मला. फडणवीस हे त्यांच्या विरोधात लढत होते. अधिवेशनात भुजबळांविरोधात सो कॉल्ड ओपन इन्क्वायरी तेव्हा सीएम फडणवीस यांनी सुरू केली होती. ते आता समीरशी मी बोलतो इतपर्यंत बदलले ते पाहूनही मला थोडं दु:ख झालं. हे राजकारण असं असेल तर ती गटारगंगा आपल्यासारख्यांना नको”, असं दमानिया म्हणाल्या.
“आधी फडणवीसांना लिहिलं. भेटले. त्यात काही होत नव्हतं. त्यानंतर मी एकनाथ शिंदे यांच्याकडे कुटुंबाला घेऊन गेले. ते म्हणाले, मी याची ताबडतोब बैठक बोलावतो. आणि दोन्ही डीसीएमशी बोलून यातून तोडगा काढू, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिंदे संवेदनशील आहेत, असं मला वाटतं. ते खरंच डिस्टर्ब झाले होते. यातून आपण मार्ग काढू असं ते म्हणाले. तसंच झालं. काही दिवसाने कळलं की ते पैसे द्यायला सुरुवात केली आहे. सर्वांचा दबाव आला असावा, एकीकडे जरांगे पाटील यांचा लढाही मोठा होत होता, त्यासाठी त्यांना द्यावं लागलं”, असा दावा दमानिया यांनी केला.
“दोन महिन्याच्यावर डोरिनचं घर कसं चाललं असतं माहीत नाही. तिच्या मुलाची गेल्यावर्षी प्रोटेस्टची सर्जरी होती. त्याला जनरल वॉर्डात ठेवलं होतं. मी तिला औषधासाठी पैसे दिले. एवढी प्रॉपर्टी असताना या लोकांना जनरल वॉर्डात पडावं लागतं. त्यावेळी सहानुभूती देणारे समीर भुजबळ बोलतात तेव्हा काय राजकारण आपण करून ठेवलंय, समाज म्हणा, राजकारणी म्हणा…कारण लोकांना सुद्धा लढायची जिद्द उरलीच नाही. डोरिनसारखी व्यक्ती लढणार कशी. तिने कंपलेंट केली, एफआयआर केली. कशी लढणार. तिच्याकडे पैसे नसेल तर कशी लढेल. ती चार पाच हजार रुपये फि घेणारा वकील ठेवेल, आणि भुजबळ अक्षरश: टॉप लॉयर घेतील. तेव्हा कोणत्या हायकोर्टात तिचा मॅटर स्टँड होईल. एक तर तारीखच मिळणार नाही. मिळाली तर त्या वकिलांसमोर तिचा वकील कसा टिकणार? हाच एक गंभीर प्रश्न आहे”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
“२० वर्षापूर्वी पैसे मिळाले असते तर तिने एफडी केली असती. दुसरीकडे कुठे गुंतवले असते. जानेवारीत पैसे दिले असते तर बँकेत ठेवल्यावर ५६ लाख रुपये व्याज मिळाले असते. मी लढू शकत नव्हते. कारण केस तिची होती. मी अनेकांशी बोलले. ते म्हणाले, जेवढे मिळाले तेवढे पदरात पाडून घे. तिच्या उतारवयात तिला तेच पैसे उपयोगी पडतील. पण तिच्याशी न्याय झाला नाही. पण तिच्या बहिणीला न्याय मिळालाच नाही. आज सांताक्रुझमध्ये ७० ते ७५ हजार पर स्क्वेअर फूट भाव आहे. तीन फ्लॅटचे २१०० फूट होतात. म्हणजे जवळजवळ १७ ते १८ कोटी झाले पाहिजे. त्या तुलनेत तिला ८ कोटी मिळाले ही खूप वाईट गोष्ट आहे”, असं दमानिया म्हणाल्या.