मुंबई : ओमिक्रॉन (Omicron) राज्यात आता हात-पाय पसरायला लागलाय. धारावीतल्या एकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. मूळ चेन्नईतला हा रहिवासी मुंबईत राहतो. संबंधित रुग्ण टांझानिया(Tanzania)हून आल्यानंतर त्याची चाचणी केली. त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालंय.
टांझानियातून भारतात
टांझानिया हा सध्या तरी धोका असलेल्या देशांच्या यादीत नाही. संबंधित व्यक्तीची विमानतळावर RTPCR टेस्ट करण्यात आली. त्याला विमानतळावर थांबण्यास सांगण्यात आलं होतं. नंतर संध्याकाळी तो धारावी(Dharavi)ला निघाला. मात्र ट्रान्झिट रिपोर्टदरम्यान त्याची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली.
सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल
तो ज्या ठिकाणी राहतो, तो परिसर नॉर्थ जीमध्ये मोडतो. या प्रकाराची माहिती कळवल्यानंतर नॉर्थ जी वॉर्डाच्या वैद्यकीय पथकानं त्याचा माग काढला. ताबडतोब सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये रुग्णाला हलविण्यात आलं. त्यासोबत असलेल्या दोघांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान, संबंधित रुग्णामध्ये कोणतीही लक्षणं नव्हती. तसंच त्यानं लसीकरण(Vaccination)ही केलेलं नसल्याचं समोर आलं आहे.
तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३ रुग्णांना ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचं निदान झालंय. एकूण रुग्ण संख्या 5वर गेलीय. रुग्णांना गंभीर लक्षणं नाहीत, मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून संबंधित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात विलगीकरणात आहेत. आज (10 डिसेंबर) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे(National Institute of Virology)कडून जनुकीय नमुन्यामध्ये निदान झालेले ओमिक्रॉन विषाणूबाधित तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले.
1. एक 48 वर्षीय पुरुष टांझानिया येथून 4 डिसेंबर 2021 रोजी आला होता. 4 डिसेंबर 2021 रोजी त्याची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ही व्यक्ती बाधित असल्याचं निदर्शनास आल्यानं सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाचं कोविड लसीकरण शिल्लक आहे. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याला सौम्य लक्षणं आहेत. सदर रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील दोघांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यापैकी कोणीही कोविडबाधित नाही.
2. एक 25 वर्षीय पुरुष लंडन येथून 1 डिसेंबर 2021 रोजी भारतात आला. त्याची कोविड चाचणी बाधित आल्यानं त्याचा वैद्यकीय नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाचे कोविड लसीचे दोन्हीही डोस पूर्ण झाले आहेत. या रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याला कोणतीही लक्षणं नाहीत. रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविडबाधित नाही.
3. एक ३७ वर्षीय पुरुष (गुजरातचा रहिवासी) दक्षिण आफ्रिका येथून 4 डिसेंबर 2021 रोजी आला होता. ज्याची कोविड चाचणी केली असता रुग्णास कोविडची बाधा झाल्याचं निदर्शनास आल्यानं त्याचा नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. या रुग्णाच्या कोविड लशीच्या दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. या रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याला सौम्य लक्षणं आहेत.
एकूण संख्या आता पाच
तिन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्याही कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी कोणीलाही कोविड बाधा झालेली नसल्याचं वैद्यकीय चाचणी अंती निदर्शनास आलं आहे. ओमिक्रॉन प्रकारानं बाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता पाच झाली आहे.