मुंबई: निवडणूक आयोगात शिवसेनेवरील सुनावणी पार पडली आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचे? यावर निवडणूक आयोग कधीही निकाल देण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच कुणाकडे किती आमदार आणि खासदार आहेत यावर पक्षाचा निकाल देऊ नये. तर पक्षाची घटना आणि जनमानसातील पक्षाचं स्थान यावर पक्ष कुणाचा याचा निर्णय द्यावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. शिवसेनेचं नेमकं काय होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. लोकांच्या मनात संभ्रम आहे. कोणताही पक्ष स्थापन होतो तो जनतेच्या आधारावर स्थापन होतो.
त्याच हेतूने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. पक्ष केवळ लोकप्रतिनिधीवर अवलंबून असेल तर कोणताही उद्योगपती आमदार आणि खासदार फोडून पंतप्रधान होऊ शकतो. मग अशा गोष्टीला काही अर्थ उरणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडून आलेले आमदार, खासदार म्हणजे पक्ष असं ठरवलं तर ते हस्यास्पद ठरेल. तसंच करायचं असेल तर मग निवडणूक आयोगाने इतका वेळ थांबण्याची गरज नाही. उद्या कोणी पैसेवाला किंवा उद्योगपती उठेल आणि निवडणूक न लढवता, पक्ष न स्थापन करता खासदार विकत घेईल आणि पंतप्रधान होईल. असं करणं म्हणजे लोकशाही नाही.
म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाही सदृढ करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. आम्ही कागदपत्रे दिल्यानंतर शिंदे गटाच्या तोंडचं पाणी पळालं असेल, असा दावाही त्यांनी केला.
आमच्या घटनेते मुख्यनेता असं पदच नाही. शिवसेनाप्रमुख या पदानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद आम्ही निर्माण केलं आहे. मुख्यनेता हे पद घटनाबाह्य आहे. ते पद विचारात घेतलं जाऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
शिवसेनेला घटना आहे. नेता आहे. त्या घटनेनुसार निवडणुका होतात. यावेळची निवडणूक 23 जानेवारी रोजी होणं अपेक्षित होतं. निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. अध्यक्ष निवडण्याची परवानगी द्या किंवा आहे तसं चालू ठेवा अशी मागणी आम्ही केली आहे. त्यावर अजून उत्तर आलं नाही. आयोग परवानगी देईल तेव्हा निवडणूक होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
घटना आणि घटनेनुसार शिवसेनेची पदं निर्माण केली आहेत. शिवसेना प्रमुख हे पद होतं. ते बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसतं. म्हणून ते पद आम्ही गोठवलं किंवा आहे तसंच ठेवलं म्हणा. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद तयार केलं. गेले काही वर्ष पक्षप्रमुख म्हणून मी शिवसेनेचं काम पाहत आहे.
शिवसेना मुख्यनेता हे पद घटनाबाह्य आहे. विभागप्रमुख हे पद केवळ मुंबईतच आहे. मुंबईबाहेर इतर जिल्ह्यात विभागप्रमुखपद नाही, असं सांगतानाच शिवसेनेवरील गद्दारांचा दावा खोटा आहे, असंही त्यांनी सांगितलं.