मुंबई: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अंतरिम जामीन नाकारला असून उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात अर्णव यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णव यांना दिलासा मिळतोय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Arnab Goswami moves SC challenging Bombay HC order against bail)
अलिबाग पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले होते. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर अर्णव यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावत त्यांना सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या वकिलाने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून आता सर्वोच्च न्यायालयातही अर्ज केला आहे. त्यामुळे त्यावर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, अर्णव यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आज कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णव यांना जामीन देण्यास नकार दिला होता. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले होते. या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असं मतही कोर्टाने व्यक्त केलं होतं. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले होते. दरम्यान, राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात एक कॅव्हिट दाखल केलं असून आमचंही म्हणणं ऐकून घ्यावं अशी विनंती कोर्टाला केली आहे.
दरम्यान, अर्णव यांना अटक झाल्यापासून भाजप नेते त्यांना जामीन देण्याची सातत्याने मागणी करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटही घेतली होती. यानंतर आज लगेचच राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चाही केली.
त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटून दिले जावे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, अर्णव गोस्वामी यांच्या घरात ज्याप्रकारे पोलिसांचा फौजफाटा शिरला आणि त्यांना अटक करण्यात आली, याविषयीही राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
संबंधित बातम्या:
राज्यपालांनी अर्णव गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतेय: भुजबळ
अर्णव गोस्वामींच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्यपालांना गृहमंत्र्यांशी बोलावे लागले: राम कदम
हायकोर्टाने स्वत: दखल घ्यावी, अर्णव गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी : देवेंद्र फडणवीस
(Arnab Goswami moves SC challenging Bombay HC order against bail)