मुंबई : गुजरातमध्ये आम आदमी पक्षानं भलेही त्यांच्या दाव्यावर खोटी ठरली असेल. मात्र गुजरातचाच निकाल आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवून गेलाय. फक्त 10 वर्षात आपनं दोन राज्यं आणि राजधानी दिल्लीतल्या महापालिकेवर सत्ता मिळवलीय. गुजरातमध्ये सत्तेचा लिखीत दावा भलेही खोटा ठरला असो, मात्र केजरीवालांच्या आपचा सक्सेस रेट अचंबित करणाराय. या घडीला देशातली सर्वात जुनी पार्टी असलेली काँग्रेस भाजपपुढे धापा टाकतीय. मात्र प्रत्येक निवडणुकीच्या मैदानात केजरीवाल नावाचा एक तगडा प्रतिस्पर्धी आपली दावेदारी मजूबत करत चाललाय. पक्षस्थापनेच्या फक्त दहाच वर्षात अनेक राज्यात आपनं भाजपसहीत काँग्रेसचं धाबं दणाणून सोडलंय.
आपची स्थापना 2012 साली झाली. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनातून आप पक्ष जन्माला आला. स्थापनेच्या 3 वर्षातच आपनं राजधानी दिल्ली काबीज केली. जिथं 15 वर्षांपासून काँग्रेसचं एकहाती राज्य होतं. काँग्रेसचा धुव्वा उडवत पंजाबची सत्ता घेतली. गोव्यात चांगली कामगिरी केली.
15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेत सत्तेत बसलेल्या भाजपला दूर केलं. आणि गुजरातमध्ये भाजपसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांसमोर वातावरण निर्मितीही केली.
पराभव काहीतरी शिकवून जातो. मात्र गुजरातमधला पराभव केजरीवालांच्या आपला राष्ट्रीय पक्षाची मान्यता देऊन गेला. देशातल्या 6 राष्ट्रीय पक्षांच्या रांगेत आता केजरीवालांचा आम आदमी पक्ष जाऊन बसलाय.
काल-परवापर्यंत देशात काँग्रेस, भाजप, मायावतींची बहुजन समाज पार्टी, कम्युनिस्ट पार्टी( CPI ), कम्युनिस्ट पार्टी मार्क्ससिस्ट( CPM ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 6 पक्ष राष्ट्रीय पक्ष होते. यात आता केजरीवालांचा आम आदमी पक्ष आलाय.
राष्ट्रीय मान्यतेसाठी पक्षाला 3 अटींची पूर्तता करावी लागते. पहिली अट पक्षाचे चार खासदार असावेत. दुसरी अट पक्षाला किमान 6 टक्के मतं मिळायला हवीत. तिसरी अट 4 किंवा त्याहून अधिक राज्यांच्या विधानसभेत एकूण 6 टक्के मतं मिळायला हवीत.
10 वर्षांपूर्वी दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलनाला बसलेला हा माणूस एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष होईल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. नेहमी ढगळा शर्ट, गळ्यात मफलर, सर्वसामान्य चेहरेपट्टी आणि मुद्देसूद बोलणारा माणूस म्हणून केजरीवाल लोकप्रिय झाले.
आंदोलनानंतर पक्ष स्थापनेची घोषणा करताच सर्वात आधी केजरीवालांच्या गुरुस्थानी असणारे अण्णा हजारे दुरावले.नंतर किरण बेदींनी साथ सोडून त्या भाजपच्या राज्यपाल बनल्या. मित्र आणि पत्रकार आशुषोत सुद्धा केजरीवालांपासून दूर झाले. आणि कधीकाळचा सर्वात जीवलग मित्र कुमार विश्वास केजरीवालांचा सर्वात मोठा टीकाकार बनला. मात्र केजरीवालांनी त्याची झळ पक्षाला बसू दिली नाही.
केजरीवाल चांगले गणितज्ञ. उत्तम आयोजक आणि राजकीय अजेंडे सेट करण्यात तरबेज आहेत. नावाप्रमाणे पक्षाचा अध्यक्षही ‘आम’ वाटायला हवा. याची केजरीवाल पुरेपूर काळजी घेतात.
जसं मोदींनी 2014 मध्ये गुजरात मॉडेलनं देशाची सत्ता मिळवली. तसंच केजरीवालांनी सवलतींचा पाऊस पाठवून आपची पाळंमुळं रोवली. देशाला विकासाची ग्वाही देताना भाजप गुजरातची साक्ष देतं. आणि केजरीवाल दिल्लीची!
दिल्लीत केजरीवाल सरकार 200 युनिटपर्यंत मोफत शिक्षण देतं. महिलांसाठी मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत पाणीपट्टी मोफत, 20 हून जास्त प्रकारच्या शस्रक्रिया मोफत, मोहल्ला क्लिनिकमधून छोटे-मोठे मोफत उपचार केले जातात.
या मोफत पॉलिसीवरुन आपवर टीकाही होते. काहींना हा प्रलोभनाचा प्रकार वाटतो. मात्र काही जण त्याचं स्वागतही करतात. एका गटाचं म्हणणं आहे की मोफतच्या पॉलिसीनं सरकारी संस्था दिवाळखोरीत निघतील. दुसरा गट म्हणतो की पैसा लोकांचाच आहे, तर टीकाकार मोफत हा शब्द का वापरतात? एक गट म्हणतो की मतदारांना मोफतच्या पॉलिसीची सवय लागली तर अर्थव्यवस्था धोक्यात येईल.
दुसरा गट म्हणतो की कर हाच सरकारचा मुख्य उत्पन्न स्रोत आहे. आणि शिक्षण, पाणी, आरोग्य देणं सरकारचं मुलभूत कर्तव्य. पण दिल्लीतल्या केजरीवाल सरकारचं सर्वात मोठं यश आहे ते म्हणजे सरकारी शाळांचं बदललेलं रुप.
खासगी शाळा खुज्या पडतील, अशी व्यवस्था दिल्लीतल्या सरकारी शाळांमध्ये आहे. अनेक सरकारी शाळांमध्ये दिल्लीत गर्भश्रीमंत लोक अॅडमिशनसाठी आग्रही असतात.
तूर्तास अजेंड्याच्या पातळीवर भाजपशी लढण्यात देशातल्या नेत्यांमध्ये केजरीवाल उजवे आहेत. म्हणजे भाजपनं काँग्रेसच्या हिंदुत्वावर बोट ठेवल्यानंतर राहुल गांधी रुद्राशांची माळ घालून गंगेच्या पूजेला पोहोचतात. मात्र केजरीवाल गुजरातच्या प्रचाराची सुरुवातच नोटांवर लक्ष्मीचा फोटो असावा, या मागणीनं करतात.
मुद्द्यांचा चेंडू नंतरहून कोण शिताफीनं टोलावतोय, यापेक्षा चेंडू आधी कोण भिरकावतोय. यात केजरीवाल तरबेज आहेत. कारण, २१ व्या शतकातल्या राजकारणात फक्त अजेंड्यानं भागत नाही. त्या अजेंड्याला झेंडा आणि प्रोपेगँडाचाही टेकू लागतो.