मुंबई : ‘दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासारख्याच आशा भोसले (Asha Bhosale) या देखील शतकात एकच आहेत’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्याप्रती सद्भावना व्यक्त केल्या. आपल्या सुमधुर स्वरांनी गेली अनेक दशके रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गेटवे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह कला आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. यावेळी फडणवीसांना आशा भोसले यांच्या कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढत सन्मानित केलं.
“मुख्यमंत्री आणी मी आज धन्य झालो. आशाताईंचा सन्मान करण्याची संधी मिळाली म्हणून धन्य झालो. गेट वे ऑफ इंडिया नावाच्या चित्रपटात आशाताई कोरसमध्ये गायल्या होत्या. आज प्रत्यक्ष गेट वे ऑफ इंडियात सन्मान होतोय. हा महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान आहे. आशाताईंचा हा प्रवास थक्क करणारा आहे. व्हर्सटाईल आणि अभिजात गायकीचा संगम म्हणजे आशा भोसले. त्या 20 भाषांमध्ये गाणी गायलेल्या अष्टपैलू गायिका आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“शतकात लता मंगेशकर जशा एक तश्याच शतकात आशा भोसले याही एकच. मला धक्का दिला म्हणून मी गायन क्षेत्रात आली, असं एका मुलाखतीत आशा भोसले म्हणाल्या होत्या. मी धक्का देणाऱ्यांचे धन्यवाद मानतो. एका दिवसात 7 गाणी गाण्याचा विक्रम आशा भोसले यांच्या नावे आहे. गुलजार यांची कतरा कतरा ही रचना आशाताईंनी उंचीवर नेली. 50 वर्षातील तरुण पिढीच्या आवडत्या गायकीचा सागर आशाताई आहेत. आशा ताईंचा आवाज कायम कानात गुंजत असतो. आशा ताईंचा स्वभाव हा जिंदादील”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांची स्तुती केली.
“आशाताईंचा गौरव करण्याचा योग मिळाला, मुख्यमंत्री झाल्याचं सार्थक झालं. 12 हजार पेक्षा जास्त गाणी आशाताईंनी गायली हा एक चमत्कारच आहे. सत्तेची खुर्ची मिळवणं हे एकवेळ सोपं असतं. मात्र लहानथोरांच्या मनावर राज्य करणं हे आशाताईंनी सोपं करून दाखवलं”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात म्हणाले. “हा पुरस्कार स्वीकारून आशाताईंनी या पुरस्काराची उंची वाढवली आहे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात हे गाणं चिरतरुण राहील. देवेंद्रजींना गाणं आवडतं, ते कधी कधी गुणगुणत असतात. आशाताई कायम एनर्जेटीक असतात”, असं मुख्यमंत्री या कार्यक्रमात म्हणाले.