मुंबई : “अध्यक्ष महोदय, ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) विधिमंडळावर काय बोलले यावर आपण हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. अध्यक्ष महोदय, आज त्याच्या पुढची कळी झालेली आहे. एका सभेमध्ये बोलताना संजय राऊत हे असं म्हणाले की, निवडणूक आयोग म्हणते शिवसेना त्यांची आहे, तुझ्या बापाची आहे का रे भो… पुढचं मी बोलत नाही”, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानसभेत खासदार संजय राऊत यांची तक्रार केली. त्यांच्या या तक्रारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी यावर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली.
संजय राऊत यांनी आज सांगलीत भाषण करताना निवडणूक आयोगाला शिवीगाळ केली. याच शिवीगाळचा मुद्दा आशिष शेलार यांनी विधानसभेत मांडला. “अध्यक्ष महोदय, निवडणूक आयोगाने घोषित केलं म्हणून तुम्ही आणि आम्ही विधिमंडळाचे सदस्य आहोत. निवडणूक आयोगाने आपल्याला जाहीर केलं म्हणून आपण या सभागृहात आलो. निवडणूक आयोगाकडे रजिस्ट्रेशन करुन आपल्या पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळालं. निवडणूक आयोग हा या सगळ्या प्रक्रियेचा आधार आहे. म्हणून मी हा प्रश्न इथे उपस्थित करतोय”, असं आशिष शेलार म्हणाले.
“शिवीगाळ करुन निवडणूक आयोगाचा उल्लेख. या मंडळाला चोरमंडळ म्हणणं ठीक. नॉटी काय याबद्दलचं उत्तर अजून द्यायचंच आहे. म्हणून या पद्धतीने शिव्या देणारं व्यक्तिमत्व सगळ्या व्यवस्थांवर चोर आणि भो असं म्हणार असेल तर माझी विनंती आहे की, या विषयाची नोंद घ्यावी. अशा प्रकारचं वक्तव्य करुन महाराष्ट्रातील जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करणं याची नोंद आपण घ्यावी”, अशी विनंती आशिष शेलार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
यावेळी छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला. “निवडणूक आयोग आहे ना! ते घेतील ना त्यांच्यावर आक्षेप! सुप्रीम कोर्टाने काल निकाल दिलाय. निवडणूक आयोगाच्या निकालाबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी इथे थांबतो. बाहेर अनेक संस्था आहेत. त्या संस्थांबद्दल आम्ही बोलणार. इथे त्याचा काय संबंध?”, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
यानंतर विधानसभा अध्यक्षांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. “आपल्या संविधानाने आपल्या जसे अधिकार दिले आहेत तसेच निवडणूक आयोगाला दिलेला आहे. आपलं नियंत्रण त्या यंत्रणेवर नसतं. पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकलाचं विश्लेषण करुन आपण निवडणूक आयोगाच्या कामकाजावर या सभागृहात तरी नाही बोललं पाहिजे. त्यामुळे आपण हा विषय इकडेच थांबवूया”, असं म्हणत त्यांनी या विषयाच्या चर्चेवर पडदा टाकला.