मुंबई : वांद्रे बस डेपोजवळ एवढे लोक एकत्र आले (Ashish Shelar on Bandra labors crowd) तरी सरकारला कळलं कसं नाही? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारला विचारला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. मात्र, मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मात्र, या घटनेवरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे (Ashish Shelar on Bandra labors crowd).
“वांद्रे बस डेपोजवळ आलेले सर्व लोक मुंबईतील वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, खार पूर्व आणि इतर भागातील आहेत. प्रश्न हा आहे की, या लोकांना एकत्रित कुणी आणलं? एकत्रित येण्याचा मेसेज नेमका कुणी दिला? याच्यावर सरकारचं लक्ष होतं का? गुप्तचर यंत्रणा कुठे आहेत? या लोकांची खदखद का बघितली गेली नाही? या सर्व गोष्टींवर चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र, सध्या लोकांनी शांततेने आणि धैर्याने घ्यावं”, असं आशिष शेलार म्हणाले.
“दोन ते अडीच तास मोठी गर्दी जमली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांकडून सर्वांची समजूत काढली जात होती. त्यांना शांतेतचं आवाहन केलं गेलं. मी स्वत: एक तासापासून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला”, असंदेखील आशिष शेलार यांनी सांगितलं.
दरम्यान, या परिस्थितीवर बोलताना काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दकी म्हणाले, “कामगारांना घरी जायचं आहे. मुंबईत ते एका घरात 12 ते 15 जण एकत्र राहत आहेत. मुंबईत राहून सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होतंच आहे. त्यापेक्षा आम्ही घरीच जातो, असं या लोकांचं म्हणणं आहे. या लोकांना आम्ही अन्नधान्य पुरवत आहोत. यावर मार्ग कसा निघेल याबाबत प्रशासनाशी आमचं बोलणं सुरु आहे. आम्ही प्रयत्न करतोय की एखादी अशी जागा निश्चित व्हावी जिथे ते आरामशीर राहू शकतात. या लोकांना समजवण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केला. पण ते आम्ही चालत घरी जाणार असं म्हणत आहेत. हे कामगार बंगाल आणि बिहारचे आहेत.”
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनच्या वाढीला विरोध, गावी जाण्याच्या हट्टापायी वांद्रे येथे हजारोंची गर्दी
मजुरांना अन्न-पाणी नको, घरी जायची सोय हवी, आदित्य ठाकरेंचं मोदी सरकारकडे बोट