मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यामुळे चव्हाण कुटुंबाचं दोन पिढ्यांपासूनच काँग्रेससोबतचं असलेलं नातं आज अधिकृतपणे संपुष्टात आलं. यावेळी अशोक चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधला. आपण काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांवर टीका करणार नाही. सकारात्मकरित्याच मी राजकारण करेल, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी चुकून काँग्रेसचं नाव घेतलं आणि एकच हशा पिकला. त्यावर त्यांना आणि खुद्द फडणवीस यांनाही सारवासारव करावी लागली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी सर्वांचेच आभार मानले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई काँग्रेसचे… चव्हाण यांनी काँग्रेसचे असा शब्द उच्चारताच फडणवीस यांनी त्यांना टोकले. भाजपचे भाजपे… असं सांगत सवयीचा भाग आहे. 50 वर्षाची सवय आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एव्हाना चव्हाण यांच्या लक्षात चूक आली. त्यांनीही हजरजबाबीपणा दाखवत 50 वर्षाची सवय असल्यामुळे चुकून झालं असं चव्हाण म्हणाले. एव्हाना उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला होता. पक्ष प्रवेशानंतरची माझी ही पहिली पत्रकार परिषद भाजपच्या कार्यालयात होत आहे. तेवढं मला एक्सक्युज करा. पहिली पीसी आहे. कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विचओव्हर थोडासा… असं चव्हाण म्हणाले.
त्यानंतर चव्हाण यांनी मूळ मुद्द्याला हात घालण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले. आम्ही विरोधात असतानाही राजकारणाच्या पलिकडेही एकमेकांना साथ दिली आहे. आता मी माझ्या आयुष्याची खरी सुरुवात करत आहे. 30 वर्षाच्या राजकीय प्रवासाचा बदल करत आहे. भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे. मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करत आहे. वाटचाल करणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
देशाच्या विकासात योगदान दिलं पाहिजे यासाठी मी आलो आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना विकासाचा दृष्टीकोण ठेवून मी काम करत राहिलो आहे. विरोधी पक्षात असतानाही आमच्या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपमध्येही प्रामाणिकपणे काम करणार आहे. राज्यात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे. माझा अनुभव पणाला लावेल, असंही त्यांनी सांगितलं.
पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधी बोलत आहेत. काहींनी समर्थन करत आहे. पण मी कुणावर वैयक्तिक टीका करणार आहे. मला बावनकुळे यांनी पक्षप्रवेश दिला. मी फिस दिली. उधार ठेवली नाही. मोदींनी सबका साथ सबका विकास हे ब्रीद ठेवून अनेक कामे केली. आम्ही मोदींच्या कामावर इम्प्रेस झालो आहोत. आम्ही विरोधात असतानाही आम्ही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही चांगल्या कामाचं कौतुक केलं. फडणवीस यांनीही आमच्याही कामाचं कौतुक केलं आहे, असंही ते म्हणाले.