विचारधारेच्या प्रश्नावर अशोक चव्हाण म्हणाले, ‘मी रामाची पूजा करतो’

| Updated on: Feb 16, 2024 | 3:40 PM

ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या विचारधारेत भिन्नता आहे. त्यामुळे भाजपची विचारधारा कशी स्वीकारणार? असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

विचारधारेच्या प्रश्नावर अशोक चव्हाण म्हणाले, मी रामाची पूजा करतो
Follow us on

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात आलेले ज्येष्ठे नेते अशोक चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये विचारधारेच्या बाबतीत मतभेद आहेत. भाजप पक्ष हा कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखला जातो. तर काँग्रेसच्या विचारधारेत हिंदुत्ववादाबाबत तितकी कट्टरता नाही. त्यामुळे आता भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपची विचारधारा आत्मसात करणं अशोक चव्हाण यांना गरजेचं असणार आहे. याबाबत अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “भाजपची विचारधार स्वीकारण्यासाठी मला हळूहळू तयारी करावी लागेल. स्विच ओव्हर करायला वेळ लागतो. हळूहळू होईल. ज्या गोष्टी सहज व्हायच्या त्या सहज होतील. ज्या गोष्टीबाबत मतभिन्नता दिसेल त्याबाबत चर्चा करून समजून घेईल. मी रामाची पूजा करतो. माझ्या वडिलांपासून परंपरा आहे. घरात दहा मिनिटं पूजा करतो. राम मंदिराच्या दिवशी मी पोस्टर लावले होते. बाबरीचा उल्लेख नव्हता. हिंदुत्ववाद म्हणजे इतरांना त्रास होईल असं नाही. तसं मला मान्य नाही. इतरांना नुकसान होईल असा हिंदुत्ववाद नाही. माझी भूमिका सर्वांना सोबत घेऊनच जाण्याचा आहे”, असं मत अशोक चव्हाण यांनी मांडलं.

“मोदींना नॉन हिंदूही भेटत आहेत. मुस्लिम कंट्रीचे राष्ट्राध्यक्षही त्यांना भेटत आहेत. परिस्थिती बदलत आहे. नॅशनल लीडरच्या स्वरुपात पंतप्रधान आहेत”, असं अशोक चव्हाण म्हणाले. “मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि चेन्नथीला यांना मी सांगितलं होतं. वैचारिक भूमिका मांडली आहे. असं अचानक आलो नाही. व्यथा मांडली आहे. पण पक्ष सोडतोय असं सांगितलं नाही”, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. “मी एकाही आमदाराला सोबत या म्हणून सांगितलं नाही. एकाही आमदाराशी चर्चा केली नाही. एकाही आमदारांना पक्ष सोडून या असं म्हटलं नाही. करायचं असतं तर करता आलं असतं. पण नाही केलं”, असंही ते यावेळी म्हणाले.

‘देशपातळीवर मोदींबाबत वलंय’

“काँग्रेस सत्तेत असतानाही मी दहा वर्ष सत्तेच्या बाहेर होतो. पदावर नव्हतो. नंतर प्रदेशाध्यक्षपद मिळालं. सत्ता हा हेतू नाही. सत्तेने फरक पडतोच. लोकांना कामं हवी आहेत. तुम्ही सत्तेत आहात की नाही याच्याशी त्यांना घेणं देणं नसतं. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे सत्तेत असताना लोकांचं काम करता येतं. देशपातळीवर मोदींबाबत वलंय आहे. ते काम करत आहेत”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

(हेही वाचा : पक्ष सोडला, पण माणसं…, पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेवर अशोक चव्हाण यांची भावनिक प्रतिक्रिया)

“काँग्रेसमध्ये असतानाही मी जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं आहे. मोदींच्या बाबतीत मी कधीच टीका केली नाही. टीकेला टीका कधीच केली नाही. मुद्दाम केली नाही. त्यांच्याबद्दल कधी अपशब्द वापरला नाही. माझी नेहमी सकारात्मक भूमिका राहिली आहे. राज्यात आणि मतदारसंघात चांगलं घडलं पाहिजे ही माझी भूमिका आहे”, असंही चव्हाण म्हणाले.

“विरोधकांनी टीका करणं अपेक्षित आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांचं कौतुक करणं अपेक्षित नाहीये. लोकांसमोर आपली भूमिका मांडणं गैर नाही. फक्त काळजी घेणं गरजेचं आहे. वैयक्तिक आरोप करू नये. वैचारिक असावे. मी काँग्रेसमध्ये असतानाही ईडीला फेस केलं आहे”, असं अशोक चव्हाण म्हणाले.