काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट, उंट, घोड्यासारखी नाही, विलासरावांचा व्हिडीओ ट्विट करत अशोक चव्हाणांचा ममतादीदींवर वार

| Updated on: Dec 02, 2021 | 1:54 PM

कुठे आहे यूपीए?... पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच हा सवाल केला आहे. ममतादीदींच्या या सवालावर काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट, उंट, घोड्यासारखी नाही, विलासरावांचा व्हिडीओ ट्विट करत अशोक चव्हाणांचा ममतादीदींवर वार
DMak
Follow us on

मुंबई: कुठे आहे यूपीए?… पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच हा सवाल केला आहे. ममतादीदींच्या या सवालावर काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट आहे. उंटा आणि घोड्यासारखी नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ ट्विट करून ममतादीदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

अशोक चव्हाण यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी हा टोला लगावला आहे. सोबत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाही व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात विलासराव काँग्रेसचं वर्णन करताना दिसत आहेत. काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे. अलिकडे काँग्रेसबाबत काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली, असंही चव्हाण यांनी नमूद केलं आहे.

विलासराव काय म्हणाले?

विलासराव देशमुखांचा हा व्हिडिओ एका कार्यक्रमातील दिसत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत असल्याचं ते दिसत आहेत. विलासराव देशमुख त्यांच्या खास शैलीत बोलताना दिसत आहेत. मला वाटतं काँग्रेसची ही धडक जी आहे ना… ती थेट आहे… सरळ आहे… हत्ती कसा सरळ चालतो… आपली चाल काही… हत्ती सारखी आहे सरळ… या मार्गावर जे येतील त्यांना बरोबर घेऊन… जे येणार नाहीत त्यांना बाजूला सोडून… ही काँग्रेसची चाल आहे. आपलं काही उंटासारखं तिरकं जात नाही. अन् घोड्यासारखं अडीच घर चालत नाही… सरळ… जो विचार आहे, गरिबांचा विचार आहे, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे…म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढं मोठं पाठबळ तुमच्यासोबत असताना… एवढी मोठी वैचारिक शिदोरी तुमच्याबरोबर असताना… कुणाला घाबरण्याचं कसलंही कारण नाही. उजळ माथ्याने त्यांच्यासमोर जा आणि सांगा त्यांना हे आम्ही केलंय आणि राहिलेलं आम्हीच करणार… दुसरा कोणीही करू शकणार नाही…

भाजपला बळ देणारं राजकारण नको

चव्हाण यांनी काल ममतादीदींना टोला लगावणारी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. भाजपच्या केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा व तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा खा. सोनिया गांधी आणि खा. राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल. मागील 7 वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.

 

संबंधित बातम्या:

CM Uddhav Thackeray Discharge | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज, रिलायन्स रुग्णालयातून ‘वर्षा’वर

औरंगाबाद तलाठी आत्महत्याः बोराटेविरोधात तक्रार करणारी महिला दोन वर्षांपासून विना अर्ज गैरहजर, तपासात संभ्रम!

मोदींची स्तुती करणं पडलं महाग, विद्यापीठाचे विद्यार्थाला पीएचडीची पदवी परत करण्याचे फर्मान