मुंबई : राज्यातील नोकर भरतीबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. नितीन राऊत यांनी आजच्या (20 जानेवारी) मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नोकर भरतीच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली आहे. ज्याप्रकारे गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक काढावं आणि त्यानुसार नोकरभरती करावी, अशी मी विनंती केली आहे. ही विनंती मान्य झाली आहे. त्याचबरोबर पदोन्नतीबाबतही मी आवाज उठवला, त्यालाही मान्यता मिळाली”, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.
राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीदेखील प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत त्यांनी थोडक्यात माहिती दिली. राज्यातील नोकर भरतीबाबत आज मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
अस्लम शेख नेमकं काय म्हणाले?
“नोकर भरती आणि त्या संबंधित विषयांवर आज बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याने त्यावर नीट मार्ग काढला जाईल”, असं अस्लम शेख म्हणाले. दरम्यान, कोरोना लसीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अस्लम शेख म्हणाले, “सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील नेत्यांनी कोरोना लस घेतली तर संपूर्ण देशात सकारात्मक चांगला मेसेज जाईल. कोरोना लसीबाबतची नियमावली त्यांनीच बनवली आहे. सर्वात आधी फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला आहे. याशिवाय कोरोना लसीबाबतची नियमावली त्यांनी काढली आहे. त्यामुळे केंद्रातील नेत्यांनी आधी लस घ्यावी”.
नोकर भरतीसाठी नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, नोकरभरतीबाबत सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्व काँग्रेस नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे नोकर भरतीची प्रक्रिया सुरु करण्याची विनंती केली होती.
पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर
“नव्या वर्षापासून शासकीय सेवेत रिक्त असणाऱ्या 1 लाखांपेक्षा जास्त पदांसाठी तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरतीप्रक्रिया सुरु करावी”, अशी विनंती पत्राद्वारे केली होती. याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक होते. त्यामुळे याबाबत लवकर घोषणा होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
• कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी कापूस पणन महासंघाला बँकाकडून कर्ज घेण्यास १५०० कोटीची शासन हमी
• राज्यात शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्णय
• खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता
हेही वाचा : फॅक्ट चेक : माहिम दर्ग्याला मुंबई पोलिसांची सलामी, ही परंपरा की सत्ताधारी शिवसेनेचा दबाव?