मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी आपआपल्या पक्षकारांची बाजू मांडली. यावेळी शिंदे गटाने आपल्याला याचिकेशी संबंधित कागदपत्रेच मिळाले नसल्याचं सांगत ही कागदपत्रे मिळावीत आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतही मिळावी अशी मागणी केली. विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यानंतर दोन्ही गटाच्या वकिलांनी मीडियासमोर बोलताना दावे प्रतिदावे केले आहेत. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मीडियाशी संवाद साधून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मीडियाशी बोलताना अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली. मी ज्युडिशिअल ऑथेरिटी म्हणून काम करत असतो. त्यामुळे त्यावर बाहेर बोलणं योग्य नाही. ज्यांना आरोप करायचे त्यांना करू दे, अशा शब्दात राहुल नार्वेकर यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. न्याय प्रविष्ट विषयात बोलणं योग्य नाही. विधानसभेचे जे नियम आहेत त्यानुसारच निर्णय दिला जाईल. संविधानातील तरतुदींचं पालन करून योग्य निर्णय घेऊ. प्रक्रियेचं पालन करू. पुढच्या सुनावणीबाबत योग्य निर्णय घेऊन याचिकाकर्त्यांना सांगू, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
यावेळी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भरत गोगावले हे मीडिया समोर दिशाभूल करणारी विधाने करत आहेत. सुप्रीम कोर्टानेच सुनील प्रभू हे व्हिप असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. भरत गोगावले जर मीडियासमोर येऊन असं वक्तव्य करत असतील तर ते फसवणूक करत आहेत. आज करार करताना देवदत्त कामं यांनी अप्रत्यक्ष करार केलेला आहे. आम्हाला आता कुठली तारीख द्यायची नाहीये असे सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली.
शिंदे गटाकडून करार झाला. आम्हाला कागदपत्रे मिळाली नाहीत असं सांगितलं गेलं. पण 6000 पानी उत्तर त्यांनी फाईल केलंय. अन् एक अक्षरही आम्हाला मिळालं नाहीये असंही सांगत आहेत. हे बोलणं चुकीचं आहे. एवढा वेळ मिळून देखील आता 14 दिवसांचा वेळ दिलाय. कागदांचे आदानप्रधान होईल. पुढच्या वेळी अध्यक्ष महोदय याबाबत निर्णय घेतील आणि शेड्युल 10 प्रमाणे हा निर्णय देतील. आम्हाला न्याय मिळेल. सत्यमेव जयते, असं प्रभू म्हणाले.