नालासोपारा (पालघर) : काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला असताना, दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा भागात मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या पालघर शाखेने नालासोपारा भागातून पाच बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या पाचही जणांकडे भारतात वास्तव्याचे कुठलेही पुरावे आढळून आले नसून, अत्यंत संशयास्पदरित्या ते नालासोपऱ्यात राहत होते.
पाचही जण बांगलादेशी नागरिक असून, ते अवैधरित्या नालासोपाऱ्यात राहत होते. त्यांच्यावर भारतीय पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3(अ), 6(अ) सह विदेशी अधिनियम 1946 चे कलम 14 प्रमाणे तुळिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात असणारे हे सर्व बांगलादेशी नागरिक आहेत. शमसुर मन्सूर शेख (70), मोसिया सोमेद मुल्ला (65), मोहम्मद कोटील खोलीफा (64), मोहम्मद जहांगीर आलम मो मोतीयार मुल्ला (45), मोफिस बु-हान शेख (19), असे अटक करण्यात आलेल्या या बांगलादेशींची नावं आहेत. नालासोपारा पूर्वेकडील आचोले गावात संतोषी माता मंदिराच्या मागील गणेश शेठच्या चाळीत अनाधिकृतपणे वास्तव्याला होते.
पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या आदेशावरुन दहशतवाद विरोधी पथक संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत करण्यात आले आहे. नालासोपारा आचोले डोंगरी येथे काही बांगलादेशी मीटिंग घेऊन दहशतवादी कटकारस्थान रचत असल्याची माहिती पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. यावरुन आज सकाळी 5 वाजल्यापासून या पथकाने परिसरात सापळा रचला होता. शेवटी सकाळी साडे नऊच्या सुमारास छापा टाकून या पाचही बांगलादेशी यांना अटक केले आहे. त्यांची चौकशी केली असता महाराष्ट्रात वास्तव्याचा त्यांच्याकडे कोणताही पुरावा सापडला नाही. त्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्यावर तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
नालासोपाऱ्यात पकडलेले बांगलादेशी महाराष्ट्रात कुठून आले, यांना कोणी आणले, यांच्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, आणखी किती बांगलादेशी या परिसरात वास्तव्याला आहेत, याचा सर्व तपास आता तुळिंज पोलीस करत आहेत.