मुंबई : महाराष्ट्र एटीएसने उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन कांड्या ठेवण्यात आलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या वकिलाचा आज जबाब नोंदवला. या जबाबात वरिष्ठ वकील के. एच. गिरी यांनी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याबाबत मोठे गौप्यस्फोट केलेत. मनसुख यांनी वकिल के एच गिरी यांच्या माध्यमातूनच तपास यंत्रणांकडून त्यांचा मानसिक छळ होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त (ठाणे) आणि पोलीस आयुक्त (मुंबई) यांच्याकडे दिली होती (ATS record statement of Mansukh Hiren advocate regarding Sachin Vaze).
मनसुख यांच्या पत्नीने आरोप केलाय, “के. एच. गिरी यांनीच सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून मनसुख यांचा मानसिक छळ होत असल्याची तक्रारीची प्रत तयार करून दिली होती. त्यानुसार मनसुख यांनी ती तक्रार मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे केली होती.”
तपास यंत्रणा, पत्रकार यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार
के एच गिरी यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे यांनीच त्यांना फोन केला होता आणि त्यांचा एक मित्र मनसुख हिरेन यांना मदत करायची आहे, असं सांगितलं होतं. तपास यंत्रणा, पत्रकार यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार प्रत करून देण्याच्या सूचना के एच गिरी यांना सचिन वाझे यांनीच दिल्या होत्या,” असेही आरोप मनसुख यांच्या पत्नीने केलेत.
मनसुख यांच्या वकिलाने जबाबात काय गौप्यस्फोट केले?
गिरी यांनी एटीएसला दिलेल्या जबाबात म्हटलंय की आपणच जवळपास दोन तास काम करुन मनसुख यांनी सांगितलेल्या महितीनुसार तक्रारप्रत ड्राफ्ट करून मनसुख यांना दिली. गिरी यांनी अजून एक खुलासा केला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की टीआरपी घोटाळ्यातील काही आरोपींचा वकील म्हणून मी काम करत होतो तेव्हापासून मी सचिन वाझे यांना ओळखतो.
वकिल गिरी यांनी देखील मनसुख यांच्या पत्नीच्या आरोपांना दुजोरा दिल्याने एकूणच वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास ATS करत आहेच. शिवाय केंद्रीय तपास यंत्रणा NIA कडूनही तपास होत आहे.
सध्या एटीएसच्या तपासाला गती मिळाल्याची चिन्हं दिसत आहेत. कारण एटीएसने मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची काल पुन्हा एकदा तब्बल नऊ तास चौकशी केली. तर त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदरहून ठाण्यात आणणाऱ्या ॲम्बुलन्स चालकाचीही काल चौकशी करण्यात आली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास एटीएसचे उपायुक्त राजकुमार शिंदे हेदेखील ठाणे एटीएस कार्यालयात दाखल झाले.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप होत आहेत, ते एपीआय सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एटीएस काही निष्कर्षाप्रत पोहोचली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
NIA कडून सचिन वाझेंचा जबाब
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला जात आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात पहिल्यांदाच सचिन वाझे यांचे स्टेटमेंट नोंदवलं जात आहे. एनआयएकडून मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीन गाडीचा तपास केला जात आहे.
सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय रायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्याचे आदेश निघाले होते.
सचिन वाझे यांची बदली
सचिन वाझे हे यापूर्वी मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मात्र, मनसुख हिरेन प्रकरणामुळे आता त्यांना CFC विभागात टाकून साईडलाईन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरुन हटवल्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून सचिन वाझे यांची बदली आता कोणत्या विभागात होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
सचिन वाझेंची ATS कडून 10 तास चौकशी
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. यानंतर सचिन वाझेंनी ATS ने दहा तास चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :
सचिन वाझे नैराश्यात का?; व्हॉट्सअॅप स्टेट्सचं कारण समोर?
फडणवीसांना CDR मिळतो, मग आम्हाला का नाही? देवेंद्र फडणवीस दिशाभूल करतायत, नाईक कुटुंब संतापलं
फडणवीसांनी अधिवेशन गाजवल्याच्या चर्चा मात्र राऊत म्हणतात, ‘विरोधी पक्ष काय करतोय?’
व्हिडीओ पाहा :
ATS record statement of Mansukh Hiren advocate regarding Sachin Vaze