मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गाडीतून वर्सोवाच्या दिशेने घरी जाताना चेहऱ्याला कपडा बांधून आलेल्या काही अज्ञात इसमांनी बॅटने गाडीची काच फोडली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप पेवेकर यांनी केलाय. संबंधित घटनेनंतर अल्ताफ पेवेकर यांनी पोलिसात धाव घेतली.
मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. मुंबईत सध्याची परिस्थिती वेगळी आहे. कारण शिवसेना दोन पक्षात विभागली गेली आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. असं असताना आता शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अल्ताफ यांनी ठाकरे गटावर आरोप केलाय. त्यामुळे याप्रकरणी काय-काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे पोलीस तपासात सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क परिसरात हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती.