मुंबई: औरंगाबादचं (aurangabad) नामांतर संभाजी नगर (sambhaji nagar) करण्याची मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव आणून ठराव मंजूर केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी दिली. ते मीडियाशी संवाद साधत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना अनिल परब यांनी ही माहिती दिली. वांद्रे पूर्वेतील शासकीय वसाहतीतील रहिवाशाी जागेची मागणी करत होते. सरकारी कर्मचाऱ्यांना तिथेच घरे मिळावीत, अशी त्यांची मागणी होती. यासाठी भूखंड वितरीत करावा अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणीही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र शासनाने सन २०२० ची पोलिस शिपाई संवर्गातील ७,२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) June 28, 2022
मी औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं ही मागणी केली आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही मागणी मंजूर करावी, अशी मागणी आजच्या बैठकीत केलीय. हा विषय अतिशय महत्वाचा आहे. गेली कित्येक वर्षे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. उद्याच्या बैठकीत हा विषय आणावा आणि मंजूर करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केलीय. तसंच वांद्रे पूर्व भागातील जी सरकारी वसाहत आहे त्या वसाहतीतील रहिवाश्यांना तिथेच घरं मिळाली अशी मागणी शिवसेना गेली कित्येक वर्ष करत आहे. म्हणून उद्याच्या बैठकीत हा विषयही घेऊन यावा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची घरं मिळावी, अशी मागणी केल्याची माहितीही अनिल परब यांनी दिलीय.
महाराष्ट्र शासनाने सन 2020 ची पोलिस शिपाई संवर्गातील 7,231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. सदरहू पोलिस भरतीमधील लेखी परीक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पद्धतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
तर, महाराष्ट्रात भविष्यातील विजेची गरज लक्षात घेता अतिरिक्त वीज निर्मितीसाठी ऊर्जा विभाग व अदानी ग्रीन एनर्जी समूह यांच्यात एक महत्वाचा सामंजस्य करार झाला. माझ्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. हा करार म्हणजे अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात राज्याची नवी भरारी ठरणार आहे, असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.