Baba Siddique Death :राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्धिकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ते आधी काँग्रेसमध्ये होते. विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने त्यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं बोललं जात होते. पण त्याआधीच बाबा सिद्धिकी यांची हत्या करण्यात आली आहे.
कॉंग्रेस पक्षातून राजकीय प्रवास
- बाबा सिद्दिकी यांचा जन्म 30 सप्टेंबर 1958 ला झाला होता. त्यांनी बीकॉमपपर्यंत शिक्षण घेतले होते. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.
- सिद्दिकी यांनी वयाच्या 16-17 व्या वर्षापासूनच कॉंग्रेस पक्षातून राजकीय प्रवास सुरु केला होता. सुरुवातीला ते मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य राहिले. 1999 साली बाबा सिद्दीकी यांनी वांद्रे पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ते पहिल्यांदा विजयी झाले.
- 2014 पर्यंत विधानसभेवर ते सलग तीन वेळा निवडून आले होते. नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 या काळात ते कामगार, अन्न नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री होते. 2014 साली बाबा सिद्दिकी यांचा भाजप नेते आशिष शेलार यांनी पराभव केला होता.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी बाबा सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्वमधून तयारी सुरु केली होती. वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचे बाळा सावंत हे आमदार होते. त्यांचं 2015 साली निधन झालं होतं. पण पोटनिवडणुकीत काँग्रेसने नारायण राणे यांना तिकीट दिलं होतं.
- 2019 च्या निवडणुकीसाठी वांद्रे पूर्वमधून बाबा सिद्दीकी यांनी निवडणूक न लढवता त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांना रिंगणात उतरवले होते.
बाबा सिद्दिकी यांचं बॉलीवूडशी नाते
बाबा सिद्दिकी हे 15 वर्षं वांद्रे पश्चिममधून आमदार असल्याने अनेक अनेक बॉलीवूड कलाकारांसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. सलमान खान पासून संजय दत्त पर्यंत अनेक त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत होते. दरवर्षी ते रमझान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे. ज्याला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावायचे.