महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहत असताना ‘टीव्ही 9 भारतवर्ष’कडून ‘सत्ता संमेलन महाराष्ट्र’ हा कार्यक्रम सोमवारी घेतला. मुंबईतील परळ येथील आयटीसी ग्रँडमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी मोठा गौप्यस्फोट केला. बाबा सिद्दिकी किंवा मला लॉरेन्स बिश्नोई किंवा कोणत्याही व्यक्तीकडून धमकी आली नव्हती, असे झिशान सिद्दिकी यांनी म्हटले. यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. आतापर्यंत बाबा सिद्दिकी यांना धमक्या मिळाल्याच्या बातम्या येत होत्या. त्या सर्व बातम्यांचे खंडन झिशान सिद्दिकी यांनी केले आहे. या कार्यक्रमात झिशान सिद्दिकी यांनी महाविकास आघाडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात मुक्तपणे चर्चा केली. परंतु भाजपसंदर्भात बोलण्यास नकार दिला.
आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात निवडणूक लढली होती. नंतर आम्ही एकत्र आलो. ही अनैसर्गिक युती आहे. काँग्रेसच्या आमदारांना जयपूरला नेलं होतं. वर्षा गायकवाड आणि मी महाविकास आघाडीचा विरोध केला होता. कारण वर्षा गायकवाड यांच्या विरोधात शिवसेना लढली होती. आज त्या महाविकास आघाडीचा प्रचार केला होता. महाविकास आघाडीत असताना मला शिवसेनेने त्रास दिला होता. आमदारांना फंड मिळायचा, तो मला दिला जात नव्हता. कोणत्याही कार्यक्रमाला मला बोलावलं जात नव्हतं. झिशान सिद्दीकी आमदार म्हणून तुम्हाला काही सांगत असेल तर तुम्हाला त्याचं ऐकायचं नाही असं अधिकाऱ्यांना सांगितलं जात होतं. फार कठीण काळ होता. मी आवाज उठवत होतो. दिल्लीतून फोन येत होते. तुम्ही बोलू नका, आघाडीत गडबड होईल. माझे वडील अस्वस्थ होत होतं. मुख्यमंत्र्यांचं तुमच्या सीटकडे लक्ष आहे, असं मला सांगितलं जायचं. आज तीच जागा काँग्रेसने ठाकरेंना दिलं.
काँग्रेस ही सेक्युलर विचारधारेची पार्टी आहे. अजितदादांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते धर्मनिरपेक्ष आहे. मी ती विचारधारा बदलली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पण उद्धव ठाकरे दर रोज विचारधारा बदलत आहे. माझे वडील गेल्यानंतर अनेक पार्टीचे लोक आमच्या घरी आले. अनेकांनी मला तुम्ही निर्णय घेऊ नका. तुम्हाला बिनविरोध निवडून आणू असं सांगितलं. पण अंधारात काही खेळ खेळला गेला. माझ्या विरोधात उमेदवार दिला. पण अजितदादांनी मला साथ दिली. त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो.
काँग्रेसने शिवसेनेशी युती केली तेव्हा आम्ही काँग्रेस सोडली नाही. आता आम्ही राष्ट्रवादीत आहोत. काँग्रेस म्हणायची किमान समान कार्यक्रम झाला पाहिजे. पण विधानसभेत उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या गोष्टी करायचे. ‘मोहब्बत की दुकान की बात करना और दिल में मोहब्बत रखना बात अलग है’. उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही काही गोष्टी केल्या आणि दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात तेव्हा अशा पक्षासोबत काँग्रेस युती करत असेल तर ते काय आहे.
१० किलो वजन कमी करा असं मला राहुल गांधी यांच्या टीममधून सांगितलं होतं. मी तो पक्ष सोडला आहे. त्यामुळे मी त्या नेत्याबाबत बोलत नाही. मी जेव्हा ही गोष्ट सांगितली होती, तेव्हा मला १० ते १२ काँग्रेस नेत्यांनी मेसेज करून सांगितलं की, ते कोण लोक आहेत मला माहीत आहे, असं हे नेते म्हणाले होते. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे चांगले नेते आहेत. पण या दोन्ही नेत्यांच्या आजूबाजूचे लोक बरोबर नाही. हे लोक राहुल गांधींना खाली खेचण्याचं काम करत आहे. मी कधी राहुल गांधींविरोधात बोललो नाही.
मी भाजपमध्ये नाही. मी काँग्रेसमध्ये होतो. त्यामुळे काँग्रेसबाबत बोलेल. मी आता राष्ट्रवादीत आहोत. राष्ट्रवादीच्या बाबत बोलेन. मला योगी आदित्यनाथ यांच्याबाबत माहिती नाही. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सर्व काँग्रेसमध्ये होते. आम्ही काँग्रेसमध्येच होतो. अनेक पक्षात वेगळं काही बोलणारे लोक असतात. पण त्या व्यक्तीच्या मताशी सर्व सहमत असतीलच असे नाही.