मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेने आज सचिन तेंडुलकर यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी देव आमचा जुगार खेळतो, परत करा, परत करा, भारत रत्न परत करा, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातच ही आंदोलने झाली. यावेळी पोलिसांनी आधी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, बच्चू कडू यांनी नकार दिल्याने अखेर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं. या परिसरात पोलिसांचा मोठी बंदोबस्त ठेण्यात आला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी एका जुगाराच्या जाहिरातीत काम केलं आहे. सचिन यांच्या ऑनलाईन गेमची जाहिरात करण्यावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत. त्यांना देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ते जुगाराला प्रोत्साहन देणारी जाहिरात कशी करू शकतात? असा सवाल करत बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना कडाडून विरोध केला.
बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना जाहिरात केल्याबद्दल जाहीर माफी मागण्याची मागणीही केली होती. पण सचिन यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. तसेच बच्चू कडू यांनी या प्रकरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करून सचिन यांना या जाहिरातीतून माघार घेण्याची विनंती केली होती. पण राज्य सरकारनेही त्याकडे दुर्लक्ष केलं. राज्य सरकारच काही करत नसल्याने निराश झालेल्या बच्चू कडू यांनी आज अखेर त्यांच्या समर्थकांसह सचिन यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जोरदार निदर्शने केली.
यावेळी बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. परत करा, परत करा, भारतरत्न परत करा, देव आमचा जुगार खेळतो, वंदे मातरम आदी घोषणा देत या समर्थकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. पण बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे बच्चू कडू यांना वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बच्चू कडू समर्थक संतापले आहेत. बच्चू कडू यांच्या समर्थकांनी वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आम्ही फक्त ताब्यात घेऊ, आमच्यासोबत चला असं आम्हाला पोलिसांनी सांगितलं. असं असताना आता बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला जात आहे? त्यांचा गुन्हा काय? समाजाला बिघडवणारी जाहिरात करू नका, असं भारतरत्नला सांगणं हा गुन्हा आहे काय? असा संतप्त सवाल करत आम्हालाही पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी बच्चू कडू समर्थकांनी केली आहे.
प्रत्येक गणपतीच्या मंदिरासमोर आम्ही दानपेटी ठेवणार आहोत. जेवढा पैसा जमा होईल तेवढा निधी सचिन तेंडुलकर यांना देण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकर यांना आर्थिक विवंचना असेल तर त्यांना दान गोळा करून दिलं जाईल. सचिनला तेंडुलकर यांना चांगली बुद्धी द्या, असं साकडं आम्ही गणपतीला घालणार आहोत. त्यांनी भारतरत्न परत करावा. ते भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. पैसा महत्त्वाचा की देश महत्त्वाचा आहे? आम्ही नोटीस तयार केली आहे. सचिन यांना नोटीस पाठवणार आहोत, असं बच्चू कडू म्हणाले.
भारतरत्नाने जुगार रत्न होऊ नये. महात्मा फुले, भगत सिंग आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिला नाही. सचिन यांना मिळाला. त्यांनी त्याचा मान राखावा, असं सांगतानाच आम्ही सचिन यांच्या घराबाहेर दानपेटी ठेवणार आहोत. त्यातील पैसा त्यांनी घ्यावा. आमचं हे हे पहिल्या टप्प्यातील आंदोलन आहे, असंही त्यांनी सांगितलं.