बदलापूर प्रकरणात मोठी अपडेट, आरोपीविरुद्ध सर्वात महत्वाचा पुरावा आला समोर

| Updated on: Aug 28, 2024 | 5:41 PM

घटनेच्या महिन्याभर आधीपासून शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद होते. सीसीटीव्ही बंद असल्याने तांत्रिक पुरावे जमा करण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद असल्याने घटनेच्या वेळी शाळेत असल्याचा पुरावा अद्याप हाती आला नव्हता.

बदलापूर प्रकरणात मोठी अपडेट, आरोपीविरुद्ध सर्वात महत्वाचा पुरावा आला समोर
बदलापूर अत्याचार प्रकरण
Follow us on

बदलापूर चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. राज्यात विरोधी पक्षांनी ठिकाठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी राज्य शासनाने एसआयटीमार्फत सुरु केली आहे. बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी प्रमुख आरती सिंह बुधवारी बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्या दिवशी पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची चौकशीसुद्धा त्या करत आहेत. दरम्यान पोलिसांना या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेविरोधात महत्त्वाचा तांत्रिक पुरावा सापडला आहे. शाळेच्या गेटच्या बाहेरच्या सीसीटीव्हीत अक्षय शिंदे शाळेत जाताना आणि येताना दिसून येत असल्याचा पुरावा सापडला.

अखेर असा मिळाला पुरावा

घटनेच्या महिन्याभर आधीपासून शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद होते. सीसीटीव्ही बंद असल्याने तांत्रिक पुरावे जमा करण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद असल्याने घटनेच्या वेळी शाळेत असल्याचा पुरावा अद्याप हाती आला नव्हता. त्यामुळे एसआयटीकडून अनेक दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर सीसीटीव्हीचा महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. एका दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेच्या दिवशी अक्षय शिंदे शाळेच्या आत जाताना आणि बाहेर पडताना दिसून येत आहे.

दुसरा गुन्हा दाखल

बदलापूरमध्ये घडलेल्या दोन चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षय शिंदेवर आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील दुसऱ्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी अक्षय शिंदे यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल केला आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा सखोल तपास करत असून बदलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा आणि एसआयटी तपास पथक दुसऱ्या गुन्ह्याचा देखील शोध घेत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास अधिक वेगाने पुढे सुरू आहे.

…तर पोलीस अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकणार

बदलापूरला दुःखद घटना घडली. या प्रकरणात जे कोणी दोषीवर असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. सरकार येतील, सरकार जातील पण महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत. महिलांना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. महिला अन्याय करणाऱ्यांना फाशी आणि जन्मठेपेची तरतूद करणार आहोत. तसेच महिलांवर अन्याय झाल्यावर जर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर त्यांना पण जेलमध्ये टाकणार आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.