मुंबई : “कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणातील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडक यांनी वाचवल्याचा दावा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. हा दावा केवळ हास्यास्पदच नसून बालिशपणाचा आहे”, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे (Bahujan Vikas Aghadi spoke person Rajendra Patode) यांनी केली आहे.
“माजी गृहमंत्री, दिवंगत आर. आर. पाटील हे संभाजी भिडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप झाला होता. आता ते काम राज्याचे जलसंपदा मंत्री करत आहेत”, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यावर पलटवार करताना जयंत पाटील यांनी कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणात प्रकाश आंबेडकरांचाच हात असल्याचा दावा केला आहे. या दाव्यावरुन राजेंद्र पातोडे (Bahujan Vikas Aghadi spoke person Rajendra Patode) यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.
“आंबेडकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका वस्तुस्थितीवर आधारित आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनीच पत्रकार परिषद घेवून या हल्ल्यामागील खरे सुत्रधार म्हणून संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना समोर आणले होते. पुणे पोलीस अधीक्षकांच्या सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावे आहेत. याच संदर्भात दाखल झालेल्या एफआयआर मध्ये आरोपी क्रमांक 1 म्हणून संभाजी भिडे आणि आरोपी क्रमांक 2 म्हणून मिलिंद एकबोटे यांची नावे आहेत. मिलिंद एकबोटेंना अटक झाली होती. त्यांनी याप्रकरणी जामीनची मागणी केली होती. मात्र संभाजी भिडेंना अटक झाली नाही. याउलट गुन्हा दाखल झालेल्या भिडेंना जयंत पाटलांचे संरक्षण आणि आसरा देण्यात आला “, असा गंभीर आरोप राजेंद्र पातोडे यांनी जयंत पाटील यांच्यावर केला आहे.
“राष्ट्रवादीला गेल्या दोन वर्षात आंबेडकर समूहाच्या आणि कथित शहरी नक्शलवादच्या नावाने कोठडीत ठेवलेल्या विचारवंतांची आठवण झाली नाही. निवडणुकीच्या काळात मते मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने स्मारक, कोरेगाव कोरेगाव प्रकरणावरुन राजकारण केलं. दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांची बदनामी करण्याचे काम राष्ट्रवादीने हाती घेतलं. राष्ट्रवादीच्या या सर्व प्रयत्नांना आंबेडकरी जनता बळी पडत नसल्याने राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकरांवर बालीशपणाचे आणि हास्यास्पद आरोप केले आहेत”, असा घणाघात राजोंद्र पातोडे यांनी केला.
“खैरलांजी नंतर राज्यात झालेली आंदोलने ही नक्शलवादाचं समर्थन करणारे असल्याचा आरोप तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केला होता. आंबेडकरी जनता हे विसरलेली नाही. गेली दोन वर्षे मूग गिळून गप्प बसलेल्या राष्ट्रवादीला अचानक आंबेडकरी जनतेचा आलेला पुळका आंबेडकरी जनता जाणून आहे, याचेही भान जयंत पाटलांनी ठेवावे”, असा टोला राजेंद्र पाचोडे यांनी लगावला.