‘आमची युती झाली तर चांगलंच’, बाळा नांदगावकर यांचं मोठं वक्तव्य, मनसे-भाजप युती होणार?

| Updated on: Mar 04, 2024 | 6:24 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होईल का? असा प्रश्न सातत्याने चर्चेत येतोय. आगामी काळात लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची घोषणा आता कधीही होऊ शकते. या निवडणुकीसाठी भाजप प्रचंड रणनीती आखत आहे. भाजपचा या रणनीतीमध्ये मनसेसोबत युती करण्याचा प्रयत्न आहे का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण त्याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं युतीबाबत मोठं वक्तव्य समोर आलं आहे.

आमची युती झाली तर चांगलंच, बाळा नांदगावकर यांचं मोठं वक्तव्य, मनसे-भाजप युती होणार?
devendra fadnavis and raj thackeray
Follow us on

गोविंद ठाकुर, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 4 मार्च 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात जोरदार घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार निवडून यावं यासाठी भाजपप्रणित एनडीएकडून अनेक पक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भाजपसाठी आगामी लोकसभा निवडणूक ही महत्त्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमधील संबंध अधिक घनिष्ठ झाल्याचं बघायला मिळालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने भेटीगाठी होत आल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी दोन ते तीन वेळा राज ठाकरे यांच्या घरी जावून भेट घेतली आहेत. तसेच राज ठाकरे यांनीदेखील फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृह येथे जावून भेट घेतल्याचं समोर आलं आहे. याशिवाय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही भेटीगाठी घडून आल्या आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे संकेत ‘टीव्ही 9 मराठी’च्या कार्यक्रमात दिले होते. त्यामुळे सध्याचं वातावरण भाजप आणि मनसेसाठी सकारात्मक दिसत आहे. याच दरम्यान आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे.

‘कोण वेश बदलून येतो का? कोण डोळा मरतोय?…’

“आम्ही आतापर्यंत स्वबळावर निवडणूक लढवलेली आहे. आमच्या आढावा बैठका सध्या सुरू आहेत. सध्या देशात युती आणि आघाडी सुरू आहे. एक हाती सरकार कोणाची येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आमची युती झाली तर चांगलंच आहे. कोण वेश बदलून येतो का? कोण डोळा मरतोय? कोण टाळी देतोय का? हे आम्हीही पाहतोय”, असं सूचक वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले?

“अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. बरेचसे पक्षाचे उमेदवार हे संभाव्य आहेत. भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. आम्ही ऐकला चलोच्या भूमिकेतच निवडणूक नेहमी लढत आलो आहोत. युतीत वाटाघाटी हे चालत असतं. आमचा 9 तारखेला कार्यक्रम होणार आहे. आमच्या आढावा बैठका सुद्धा सुरू आहेत. सरकार व्यवस्थित बसत नाही. अशा वेळेस पाहू. कोण वेश बदलून येतं का? कोण टाळी देतं का? आम्ही पाहतोय. नाहीतर आमची लढाई आहेच एकटा जीव सदाशिव”, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

“मी माझ्या आयुष्यात आठ निवडणुका लढवल्या. त्यातील दोन लोकसभा आहेत. त्यामुळे लोकसभा ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही. मी निवडणूक खेळतो, लढत नाही. एन्जॉय करा. तुम्ही शिकलात की सगळं काही चांगलं”, अशीदेखील प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.