मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत नेहमीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे किस्से सांगत असतात. बाळसाहेबांचा स्वभाव, त्यांची निर्णय घेण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत, करारीपणा, मिष्किल वृत्ती आणि हजरजबाबीपणा यावर ते भरभरून बोलत असतात. आज त्यांनी बाळासाहेबांबद्दलचा एक किस्सा सांगितला. यातून बाळासाहेबांचा हजरजबाबीपणा तर दिसतोच पण राज्यकर्ता कसा असावा याबाबतचं बाळासाहेबांचं व्हिजनही दिसून येतं. (balasaheb thackeray wanted chief minister like a r antulay, says sanjay raut)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात आज हा किस्सा सांगितला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी नोकरशहांबद्दल केलेल्या विधानाचा संदर्भ घेऊन राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हा किस्सा सांगितला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात वादळ निर्माण केले. राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता येणार असे वातावरण निर्माण झाले. पत्रकारांनी एकदा बाळासाहेबांना विचारले, ”तुमचा मुख्यमंत्री कसा हवा?” बाळासाहेबांनी क्षणाचाही विचार न करता सांगितले, ”कसा म्हणजे? बॅ. अंतुलेंसारखा!”, असं राऊत यांनी सांगितलं.
बॅ. अंतुले यांनी लालफितशाहीच मोडून काढली होती. सामान्यांची कामे लालफितशाहीत अडकू नयेत अशी त्यांची भूमिका होती. लोकांनी निवडून दिलेल्या लोकांनीच चालवावे आणि नोकरशहांनी फक्त हुकूम पाळावेत, हे त्यांचे धोरण होते. आज नोकरशहा निवडून आलेल्यांना हुकूम देतात व आपल्याच सरकारची माहिती विरोधी पक्षाला देतात. म्हणून प्रशासनावरील मांड घट्ट हवी. उमा भारती यांनी जे सांगितले ते अगदीच चुकीचे नाही, असंही ते म्हणाले.
‘नोकरशहा आमच्या चपला उचलतात,’ असे एक विधान उमा भारती यांनी केले. उमा भारती या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. केंद्रातही त्यांनी काम केले. आज त्या कोठेच नाहीत, पण नोकरशहा व राज्यकर्त्यांचा झगडा जुना आहे. मंत्रिमंडळे, मुख्यमंत्री येत-जात असतात. आम्ही कायम असतो हा नोकरशहांचा अहंकार आहे. लालफितशाही गोरगरीबांचा गळा घोटत असते, पण स्वतःच्या घरासाठी चांगले भूखंड लालफित ढिली करून सोडवत असते. हे मुंबई-महाराष्ट्रातही अनेकदा घडले आहे. नोकरशहा येणाऱ्या सरकारसमोर झुकत असतात, हे सत्यच आहे, असं त्यांनी सांगितलं.
माझ्या राज्यात लालफितशाही चालणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत. पण नोकरशहांनी आपल्या चपला उचलाव्यात अशी त्यांची भूमिका नव्हती. मोदी यांचे राज्य चार प्रबळ नोकरशहाच चालवतात, असे नेहमीच सांगितले जाते. नोकरशहा राज्यकर्त्यांचा ताबाच घेतात व त्यांना पैसे खाण्याचे, त्यातून सुटण्याचे मार्गही दाखवतात. त्यामुळे राज्यकर्ते नोकरशहांच्या कलाने चालतात. उमा भारती सांगतात त्यापेक्षा वेगळे चित्र अनेक राज्यांत दिसते, असंही ते म्हणाले.
राजकारण्यांकडून विविध पातळ्यांवर मनोरंजन होतच असते. सध्याच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची ‘हास्यजत्रा’च केली आहे. किरीट सोमय्या हे भाजपचे माजी खासदार रोज सकाळी उठून महाविकास आघाडीतील एका मंत्र्यावर आरोप करतात. त्यांचे आरोप हे साबणाचे बुडबुडेच ठरतात, असं सांगतानाच महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे. दिल्लीत मधू दंडवते, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, कॉ. हिरेन मुखर्जी यांनी काँग्रेस सरकारविरोधात जोरदार मोहिमा राबवल्या. अनेक भ्रष्टाचार उघड केले. इंदिरा गांधी, संजय गांधीही त्यातून सुटले नाहीत. महाराष्ट्रात दत्ता पाटील, मृणाल गोरे, केशवराव धोंडगे, कृष्णराव धुळपांपासून गोपीनाथ मुंडेंपर्यंत अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला घाम फोडला, पण त्यात आजच्यासारखा विखार नव्हता. शिवाजीराव निलंगेकर, बॅ. अंतुले, विलासराव देशमुख यांनाही विरोधी पक्षाच्या जोरदार हल्ल्यांमुळेच जावे लागले, पण आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे ‘हास्यजत्रा’ म्हणून पाहिले जात नव्हते, असा टोलाही त्यांनी लगावला. (balasaheb thackeray wanted chief minister like a r antulay, says sanjay raut)
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 26 September 2021 https://t.co/wMZJasE8iD #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 26, 2021
संबंधित बातम्या:
भाजपचा पुण्यात फिरकू न देण्याचा इशारा, संजय राऊत थेट वडगाव शेरीत मेळावा घेणार, नेमकं काय घडणार?
(balasaheb thackeray wanted chief minister like a r antulay, says sanjay raut)