VIDEO: महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच जाहीर होणार?; पवार-थोरात भेटीत काय घडलं?, वाचा

| Updated on: Jun 07, 2021 | 5:07 PM

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. (balasaheb thorat meets sharad pawar)

VIDEO: महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच जाहीर होणार?; पवार-थोरात भेटीत काय घडलं?, वाचा
बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई: राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्यांसंदर्भात चर्चा केली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (balasaheb thorat meets sharad pawar)

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची सकाळी भेट घेतली. यावेळी थोरात यांनी पवारांशी महामंडळ आणि समित्यांचं गठन करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधून याबाबतची माहिती दिली. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते मार्गदर्शक आहेत. त्यांच्याशी आम्ही नेहमीच चर्चा करत असतो. तशीच आजही चर्चा केली. अनेक महामंडळांच्या नियुक्त्या बाकी आहेत. राज्य पातळीवर समित्यांचं गठन बाकी आहे. त्यावर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच राज्यात अनेक प्रश्न असतात. त्यातील दहा बारा प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात. या सर्वांवर या निमित्ताने चर्चा झाली, असं थोरात म्हणाले.

कोरोना संकटामुळे नियुक्त्या रखडल्या

राज्यातील महामंडळांची संख्या मोठी आहे. या महामंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट आणि राज्य मंत्रीपदाचा दर्जा असतो. त्यामुळे मंत्रीपद न मिळालेले आमदार आणि इतर कार्यकर्ते महामंडळ मिळवण्यासाठी लॉबिंग करत असतात. सर्वच कार्यकर्त्यांना महामंडळ देणं शक्य नसल्याने अनेकांची नाराजीही ओढवली जाते. त्यातून पक्षांतर्गत बंडाळी निर्माण होते. त्यामुळे महामंडळाच्या नियुक्त्या नेहमीच रखडल्या जातात. यावेळी राज्यात तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर हे सरकार स्थिर स्थावर होत नाही तोच कोरोनाचं संकट आलं. त्यात दीड वर्षे गेल्याने महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या होत्या.

याद्या तयार, पण मुहूर्त सापडेना

राज्यातील आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या महामंडळांवरील नियुक्तीच्या याद्या तयार आहेत. मात्र, या नियुक्त्या जाहीर करण्याचा मुहूर्त सरकारला अजून सापडलेला नाही. आता थोरात यांनी पवारांची भेट घेऊन त्यावर चर्चा केल्याने यातून मार्ग निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोन नियुक्त्या

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार फौजिया खान आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची नुकतीच राज्य वक्फ मंडळावर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आजच्या पवार-थोरात भेटीने नियुक्त्या कधी जाहीर होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात सिंचन महामंडळे, विदर्भ, कृष्णा खोरे, म्हाडा, सिडको आणि देवस्थान या महामंडळ आणि समित्यांवरील नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्याकडे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही गंभीर आहोत. आमचा आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरक्षणाबात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भूमिका मांडली आहे. खासदार संभाजी छत्रपती मला भेटले होते. त्यांनी शासनाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्या अपेक्षांवर आम्ही काम करत आहोत. मराठा तरुणांना आरक्षण मिळावं यासाठी आम्ही गंभीर आहोत. संभाजीराजे तरुणांचं संघटन एकत्र ठेवत आहेत. त्यांच्या डोक्यात काहीच राजकारण नाही, असं थोरात यांनी स्पष्ट केलं. (balasaheb thorat meets sharad pawar)

 

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा

संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या नेतृत्वात सोलापुरात तिसरा मराठा मोर्चा निघणार?; हालचालींना प्रचंड वेग

Maharashtra News LIVE Update | जालना शहर तसेच परिसरात संततधार पावसाला सुरुवात  

(balasaheb thorat meets sharad pawar)