बाळासाहेब म्हणायचे नेता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो – शिंदे

| Updated on: Oct 12, 2024 | 8:14 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला. एमआयएम आणि उबाठा मध्ये आता फरक नाही.

बाळासाहेब म्हणायचे नेता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो - शिंदे
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण उठाव केला नसता तर फक्त फेसबुक लाइव्हच झालं असतं. आपण फेसबुक लाइव्हवाले नाही, आपण फेस टू फेस काम करणारे लोक आहोत. बाळासाहेब म्हणायचे नेता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. आपण ते शिकलो. करतो. पण नर्मदेचे गोटे कोरडेच राहिले. महाराष्ट्राचं चित्र काय असंत. मोरू उठला, अंघोळ केली. अन् मोरू झोपला. आता तोच मोरू गल्लो गल्लीत फिरत आहे. दिल्लीत फिरत आहे. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा म्हणून फिरत आहे. अरे बाबा तुमच्या सहकाऱ्यांना तुमचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून चालत नाही, मग राज्यातील जनतेला कसं चालेल.

मी दोन वर्षातील रिपोर्ट कार्ड द्यायला तयार आहे. तुम्ही अडीच वर्षातील दाखवा. हिंमत असेल तर दाखवा. कोविडचं कारण सांगून त्यांना लपवता येणार नाही. लोक मरत होते, तुम्ही पैसे मोजत होता. कुठे फेडाल हे पाप. आम्ही रस्त्यावर होतो.

हरियाणाची पुनररावृती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात दोन्ही वर्षात आपण विकासकामे केली. केंद्रात गेलेला प्रस्ताव आपला परत येत नाही. डबल इंजिन सरकारचा हा फायदा आहे. अनेक योजना आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अनेक वर्षाची मागणी होती. आशाताई यांनी लाडकी बहीण योजनेचे कौतूक केले. गरीबांना मदत करणारी ही योजना आहे. शिवसेना कोणाची आहे आपण लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले. ते सहा जिंकले आपण सात जागा जिंकलो. बाळासाहेबांची विचार आपले आहेत. कोण पुढे गेलंय हे सांगण्याची गरज नाही. तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून आले हे सगळ्यांना माहित आहे. पाकिस्तानचे झेंडे तुमच्या सभेत दिसतात.

पाकिस्तानची बोली तुम्ही बोलू लागले. अशा लोकांसोबत बाळासाहेब जराही राहिले नसते. एमआयएम आणि उबाठामध्ये आता काहीही फरक राहिलेला नाही. बाळासाहेबांची सर्व स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं. शिवसेना प्रमुखांचं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. काँग्रेस संविधान बदलणार म्हणाले. पण मी सांगतो संविधान कायम राहणार. शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे राहिलो. सगळ्यांसाठी सर्वसमावेशक योजना आणत आहोत. तिजोरीवर पहिला अधिकारी शेतकऱ्यांचा आणि गरिबांचा आहे. मी सोन्याचा चमचा जन्माला आलेलो नाही. सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती होतो हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे होतं.