मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. बसवराज पाटील यांनी भाजप पक्षप्रवेशावेळी काँग्रेसवर टीका केली नाही. आपल्याला कुणाबद्दलही तक्रार नाही, असं बसवराज पाटील म्हणाले. “संपूर्ण देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेतृत्वाखाली चांगले वातावरण निर्माण झालं आहे. देश एका वेगळ्या पद्धतीने सगळ्या विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष देत विकसित होत आहे. देशासाठी आणि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. देश आणि त्याच्या पाठीमागे एक ताकद उभी करणे आपली जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगलं वातावरण आहे. राज्याला कसं पुढे घेऊन जाता येईल यासाठी खंबीरपणे फडणवीस नेतृत्व करत आहे. या नेतृत्वामागे आपण खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे म्हणून मी प्रवेश करत आहे”, असं बसवराज पाटील म्हणाले.
“ज्या पक्षात होतो, तिथे ४० वर्षांचा प्रवास आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन काम केलं. त्याच निष्ठेने आणि शुद्ध भावनेने काम करू असा शब्द देतो. माझी कुणाबाबतही तक्रार नाही”, असं बसवराज पाटील यांनी स्पष्ट केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. “ज्यांच्या प्रवेशासाठी आपण उपस्थित आहोत ते मराठवाड्यातील एक ज्येष्ठ नेतृत्व बसवराज पाटील. भाजपसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. बसवराज पाटील यांसारखा जुना आणि जाणता नेता, ज्याने काँग्रेसला मराठवाड्यात बळ दिले, ज्याने संघटन उभे केले, ४९ वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली, पाचवेळा आमदार आणि मंत्री तसेच विविध पदांवर काम केले. तरीही त्यांनी कधीही जमीन सोडली नाही. सत्ता कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही. सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते भाजपात आले म्हणून आनंद आहे”, अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली.
“मंत्री खुबा साहेबांमुळे ते आले. त्यांनी निष्ठेने काँग्रेस उभी केली. आता निष्ठेने ते भाजप वाढवतील. मी त्यांना अपेक्षा काय विचारली? तर ते म्हणाले मोदीजी विकसित भारतात देशाला परावर्तित करत आहेत. त्या मुख्य धारेत मला काम करायचं आहे. ज्या पक्षात काम करतो, त्याबाबत तक्रार नाही. समाजासाठी आणि देशाच्या मुख्य धारेत काँग्रेसमध्ये काम करता येणार नाही असे ते म्हणाले”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील बसवराज पाटील यांचं स्वागत केलं. “काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाचा बसवराज पाटील यांनी राजीनामा दिला. लाखो कार्यकर्ते म्हणाले तर वावगे होणार नाही. एक लक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याची योजना त्यांनी केली आहे. सोबत रश्मी बागल यांनी पक्षप्रवेश केला. १४ कोटी जनतेच्या मनात आदराचे स्थान आहे, असे सर्व समाजाला सोबत घेऊन व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करणारे देवेंद्र फडणवीस यांसारखा नेता आमच्यासोबत आहे. आज १ हजारांहून अधिक प्रवेश झाले. ७५० दुपट्टे मी गळ्यात टाकले. प्रहार संघटनेचे दिव्यांग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष यांनी भाजपात प्रवेश केला. प्रहार संघटनेने त्यांचे आश्वासन पाळले नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांवर विश्वास ठेवत त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला”, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.