मुंबई : बीडीडी चाळ रहिवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. वरळीतील बीडीडी चाळ (BDD Chawl) आता बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावची बीडीडी चाळ शरद पवार नगर, तर ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळ राजीव गांधी नगर नावाने ओळखली जाणार आहे. याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आलाय. याबाबतची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) केली होती. त्यानंतर आता शासन निर्णय जारी करण्यात आल्यानं त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे सध्या प्रगतीत आहेत. सन 1921-1925 च्या दरम्यान तत्कालीन मुंबई विकास विभागाने या चाळी बांधलेल्या असल्याने, त्या बीबीडी चाळी म्हणून ओळखल्या जातात. या चाळींचा पुनर्विकास होत असल्याने या चाळींचे नामकरण करण्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी 2022 च्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत जाहीर केलं आहे. त्यानुसार उपरोक्त बीडीडी चाळींचे पुढील प्रमाणे नामकरण करण्यात येत आहे.
1. बीडीडी चाळ, वरळी – स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर
2. बीडीडी चाळ, ना. म. जोशी मार्ग – स्वर्गीय राजीव गांधी नगर
3. बीडीडी चाळ, नायगाव – शरद पवार नगर
बीडीडी चाळ नामकरणाचा शासननिर्णय
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम पूर्ण करण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधीची गरज आहे. हा निधी उभारण्यासाठी म्हाडाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता म्हाडाने प्रकल्पाच्या तीनही ठिकाणी पुनर्वसन इमारतीसह विक्रीसाठीही घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे आता मुंबईकरांना बीडीडी चाळीमध्येही घरे उपलब्ध होणार आहेत, त्याबदल्यात म्हाडाला निधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाने यापूर्वी बीडीडी चाळीतील रहिवाशांचे प्रथम पुनर्वसन करून उपलब्ध जागेवर विक्रीसाठी घरे उभारण्याचा विचार केला होता. मात्र प्रकल्प वेळेत आणि विनाअडथळा पूर्ण होण्यासाठी म्हाडाने पुनर्वसन इमारतीबरोबरच विक्रिच्या इमरातचींचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.