गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये बंगला जाळण्यात आला. संतप्त आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत प्रकाश सोळंके यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर त्यांचा बंगलाही पेटवून देण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. थेट लोकप्रतिनिधींचं घरच पेटवण्यात आल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेवर प्रकाश सोळंके यांनीही संताप व्यक्त केला आहे. तसेच बीडची घटना हे राज्य सरकारचं अपयश आहे, असं सांगत त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर अविश्वासच दाखवला आहे.
प्रकाश सोळंके यांनी बीडच्या घटनेनंतर तीन दिवसाने पत्रकार परिषद घेऊन या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंदोलन करणारे 250 लोकं हे अवैध धंदा करणारे, काळाबाजार करणारे आणि माझे विरोधक होते. मी पोलिसांना सीसीटिव्ही फुटेज दिले आहेत. केवळ दोषींवर कारवाई करा. सरसकट कारवाई करू नका, अशी विनंती मी पोलिसांना केली आहे, असं प्रकाश सोळंके म्हणाले.
बीडची घटना म्हणजे गृहखात्याचे पूर्णपणे अपयश आहे. ज्या घटना घडल्या त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. जालना घटनेनंतर पोलिसांचं मनोधैर्य कमी झालं आहे. ते वाढवणं गरजेचं आहे, असं मला वाटतंय, असं त्यांनी सांगितलं.
माझ्या बंगल्यावर हल्ला करणारे कुठल्या पक्षाचे आहेत हे माहिती नाही. या प्रकरणात आतापर्यंत 21 लोकांना अटक झाली आहे. ही अटक सीसीटीव्ही फुटेजवर आधारीत आहे. 8 आरोपी मराठा व्यतिरिक्त आहेत. या हल्ल्यात माझ्या ऑफिस आणि घराचं संपूर्णपणे नुकसान झालं आहे. मी अजूनही तक्रार दिली नाही, असं ते म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत अनेकवेळा मी चर्चा केली आहे. मराठा आरक्षणासाठी कालबध्द कार्यक्रम द्यावा, अशी विनंती मी राज्य सरकारला केली आहे. आरक्षण कसं देणारं याबाबत देखील खुलासा करावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व आहेत. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. चुकीचा अर्थ काढला गेला. मी त्यांना कॉल केला नाही, कधीतरी भेट होईल तेव्हा प्रत्यक्ष बोलेन, असं सांगतानाच बीडमध्ये भविष्यात राजकारण काय असेल यावर मी आता भाष्य करणार नाही. वेळ आल्यावर बोलेन, असं ते म्हणाले.