अधिवेशन सुरु होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी डिवचलं, खोके सरकारच्या…

| Updated on: Jun 26, 2024 | 9:38 PM

उद्यापासून महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याआधी विरोधकांनी आज सरकारच्या चहापाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील अधिवेशनाच्या आधी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अधिवेशन सुरु होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी डिवचलं, खोके सरकारच्या...
Follow us on

अधिवेशन सुरु होणाऱ्या काही तासांआधीच उद्धव ठाकरेंनी खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन म्हणत, शाब्दिक चकमक सुरु केली. गुरुवारपासून महायुती सरकारचं शेवटचं अधिवेशन सुरु होतंय. पण या अधिवेशनाला उद्धव ठाकरेंनी खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन म्हटलंय.

टेंडर, भ्रष्टाचार आणि घोटाळे या विषयावरुन विरोधक सरकारला घेरतील हे पोस्टरबाजीतून स्पष्ट झालंय. पत्रकार परिषदेच्याआधी लावलेल्या पोस्टरमधून विरोधकांनी सरकारला डिवचलंय. महाभ्रष्टाचारी…महाघोटाळेबाज…महाटेंडरबाज…महायुती सरकार….म्हणत महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला. बाईकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाबरलेल्या स्थितीत उभे असून फडणवीस बाजूला पडलेले असून त्यांच्या हातात बॅग आहे…आणि अजित पवार बाईकच्या कॅरिअरला लटकलेले दाखवण्यात आलेत.

दुसऱ्या पोस्टरमध्ये महाराष्ट्र परमो धर्म: म्हणत सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्यांचा बंदोबस्त होणार इशारा देण्यात आलाय. तर आणखी एका पोस्टरमध्ये विधानसभा निवडणुकाचा मुद्दाच मविआनं सांगितलाय. लोकसभेत संविधानासाठी लढलो.विधानसभेत आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू आणि जिंकू…महाविकास आघाडी असा मजकूर छापण्यात आलाय.

विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आणि सरकारला शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला. त्यावरुन जनाधार गमावलेलं सरकार अशी टीका विरोधी पक्षनेत्यांनी केलीये.

महायुतीचं शेवटचं अधिवेशनं 12 जुलैपर्यंत चालणार आहे…पावसाळ्यात अधिवेशनात विरोधकांचं वादळ येईल याची झलक पोस्टरबाजी आणि उद्घव ठाकरेंच्या टीकेतून दिसलीये. ठाकरेंचं सरकार पाडून शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनात विरोधकांनी खोके खोके म्हणत टीका सुरु केली. तीच टीका शेवटचं अधिवेशन सुरु होण्याआधी उद्धव ठाकरेंनीही दिली.

उद्यापासून राज्याचं शेवटचं अधिवेशन सुरु होणार आहे. आता पुढचं अधिवेशन विधानसभेच्या निवडणुका झाल्यावरच होईल. त्यामुळं उद्यापासून सुरु होणारं अधिवेशनाआधी उद्धव ठाकरेंनी सरकारला डिवचलंय. खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असल्याचं ठाकरे म्हणालेत.

आज सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. शेतकऱ्यांना उद्वस्त केलं, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. म्हणत विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.