काशीविश्वेश्वर आणि औरंगजेबाच्या दोन राण्या, बघा भालचंद्र नेमाडे काय म्हणाले?

| Updated on: Aug 05, 2023 | 11:46 PM

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आज मुंबईत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी औरंगजेबाविषयी काही महत्त्वाचे वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या वक्तव्यांवर आता इतर विचारवंतांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काशीविश्वेश्वर आणि औरंगजेबाच्या दोन राण्या, बघा भालचंद्र नेमाडे काय म्हणाले?
Follow us on

निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता समारंभाचे आज आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि अशोक वाजपेयी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी भालचंद्र नेमाडे यांनी इतिहासातील काही घटनांचा उल्लेख करत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. खरंतर ते पुस्तक वाचनाचं महत्त्व समजावून सांगत होते. पुस्तक वाचन केल्यामुळे आपल्याला इतिहासाबद्दल योग्य माहिती मिळत गेली, असं सांगत होते. यावेळी त्यांनी इतिसातील काही घटनांवर आपली भूमिका मांडली.

“मी ज्यावेळी पुस्तकं वाचली, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, दुसऱ्या बाजीराव बाबत जी माहिती सांगितली जात आहे ती चुकीची आहे. पेशव्यांच्या तावडीतून सुटलो हे चांगल आहे”, असं भालचंद्र नेमाडे आपल्या भाषणात म्हणाले.

“औंरगजेबाचा दोन राण्या होत्या. त्या काशीविश्वेश्वराला गेल्या होत्या. त्यावेळी तिथं असलेल्या पंडितांनी राण्यांना भ्रष्ट केलं. त्यानंतर तिथं जी मोडतोड औरंगजेबाने केली त्याला ज्ञानव्यापी म्हणून आता ओळखल जातं”, असा मोठा दावा भालचंद्र नेमाडे यांनी केला.

“औरंगजेबाच्या काळात निम्म्यापेक्षा जास्त हिंदू सरदार होते. सती प्रथा बंद करणारा पहिला औरंगजेब होता. सध्या रोज बातम्या येतात, बायका भ्रष्ट केल्याच्या. तीनशे, साडे तीनशे लहान मुली पळवून नेल्या. सध्या इथे राहायचं कसं? हा प्रश्न आहे”, अशी भूमिका भालचंद्र नेमाडे यांनी मांडली.

“तुम्ही ग्रंथ पुस्तकं वाचली तर तुम्हाला सत्य समजेल, म्हणून ते वाचायला हवं. कुणाचं काही ऐकू नका तर वाचा”, असं आवाहन भालचंद्र नेमाडे यांनी केलं. तसेच “तुम्ही पुस्तकं वाचली की कोण खरं बोलतं? कोण खोटं बोलतं? हे कळतं”, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

यावेळी शरद पवार यांनीदेखील भाषण केलं. “आजचा दिवस मुंबई मराठी ग्रंथ संग्रहलयासाठी महत्वाचा दिवस आहे. ही संस्था उभी करताना 10-11 लोक एकत्र आले आणि हे संग्रहालय उभं केलं. कुठलाही देश समृद्ध कसा झाला याचा विचार करतो, माझ्या मते समृद्धी याचं मोजमाप करायचं असेल तर वाचन संस्कृती महत्वाची आहे. अनेक गोष्टी आहेत ज्या सांगता येतील. उत्तम प्रकारचे ग्रंथ या संस्थेत आहेत”, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.

“माझ्या डोळ्यासमोर ना. धो. महानोर येतायत. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. शेती मातीशी रममाण झालेला व्यक्ती म्हणून ना. धो. महानोर यांचं नाव समोर येतं. आज ते नसल्याची जाणीव होतेय. 125 वर्ष ही संस्था काम करत आहे. 10-11 लोक एकत्र आले आणि पैसे जमा करून आज ही संस्था उभी राहिली. समृद्धीची मोजमाप करायचं असेल तर सोने नाने नव्हे तर त्या संस्थेची सांस्कृतिक पातळी किती उंच आहे हे पाहावं”, असं पवार म्हणाले.

“नांदेड जिल्ह्यात सेलू नावाचे गाव आहे तिथं असलेल्या कॉलेज मधील लेखनाची उंची पुण्यापेक्षा चांगली आहे. यशवंतराव चव्हान यांना एकच आवड होती ती म्हणजे वाचन आणि ग्रंथ. ते जगात कुठेही गेले तर कामे संपल्यावर ग्रंथ खरेदीच करत असत. त्यांनी माझ्यावर एक जबाबदारी दिली होती. त्यांच्या पुस्तकाचं ग्रंथालय करावं. ते गेले त्यावेळी त्यांच्याकडे केवळ 86 हजार रूपये होते. मात्र ग्रंथांची संख्या 28 हजार होती”, अशी आठवण शरद पवार यांनी काढली.