राज ठाकरे, शिंदे आणि फडणवीस यांच्यातील बोलणी नेमकी कुठे फिस्कटली? भाजप-शिवसेनेकडून मोठा खुलासा

| Updated on: Apr 10, 2024 | 6:19 PM

राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईत हॉटेल ताज लँड्समध्ये पार पडलेल्या बैठकीत मनसेच्या महायुतीत प्रवेश करण्याबाबतची चर्चा फिस्कटली. मनसेला शिवसेकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आल्याने ही बोलणी फिस्कटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वृत्ताला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दुजोरा दिला आहे. तर भाजपकडून या वृत्तावर भूमिका मांडण्यात आली आहे.

राज ठाकरे, शिंदे आणि फडणवीस यांच्यातील बोलणी नेमकी कुठे फिस्कटली? भाजप-शिवसेनेकडून मोठा खुलासा
Follow us on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात याबाबतची घोषणा केली. यावेळी त्यांनी महायुतीकडून देण्यात आलेल्या ऑफरबद्दल माहिती दिली. मनसेच्या उमेदवाराने दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढावी, अशी ऑफर महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आली. पण आपण त्याला स्पष्ट नकार दिल्याचं राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात सांगितलं. राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईत हॉटेल ताज लँड्समध्ये पार पडलेल्या बैठकीत मनसेच्या महायुतीत प्रवेश करण्याबाबतची चर्चा फिस्कटली. मनसेला शिवसेकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आल्याने ही बोलणी फिस्कटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वृत्ताला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दुजोरा दिला आहे. तर भाजपकडून या वृत्तावर भूमिका मांडण्यात आली आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“मी शेवटचा जागावाटपाचा चर्चेला 1995 साली बसलो होतो. त्यानंतर मी आजपर्यंत जागावाटपाच्या चर्चेला कधी बसलो नाही. त्यामुळे माझा टेम्परामेंटच नाही. दोन तू घे, चार मला दे, तू ही नको ती घे, मग मला इथे सरकव, याला इथे, मला ते जमत नाही. माझ्याकडून ते होणार नाही. मला ते जमणार नाही. मला सांगितलं, आमच्या निशाणीवर लढा. ही रेल्वे इंजिन कार्यकर्त्यांच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलेलं नाही. सहज आलं आहे म्हणून मी त्यावर लढवायचं, तसं अजिबात नाही. चिन्हावर कॉम्प्रमाईज होणार नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरेंना कधीही कमळावर लढण्याचा आग्रह नव्हता. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. आम्ही कधीही अशी भूमिका मांडली नाही. तेही असा प्रस्ताव स्वीकारणार नाहीत. कारण ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे अशा मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना कमळावर लढा असं सांगण्याचे आमच्यावर संस्कार नाहीत. आम्ही त्यांच्यासमोर असा प्रस्ताव कधीही मांडणार नाहीत. त्यांचं इंजिन चिन्हं आहे”, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

प्रविण दरेकर यांची प्रतिक्रिया काय?

“तुम्ही जे काही सांगत आहात ते सूत्रांच्या माहितीनुसार सांगत आहात. त्या बैठकीला लिमिटेड लोकं होती. त्यामुळे सूत्रांची माहिती काय ते मला माहिती नाही. पण वस्तुस्थिती आणि सूत्रांची माहिती यात फरक आहे. तो विषय स्पष्ट झाला आहे. राज ठाकरे यांनी सांगितलं आहे की, मी कुठल्याही दुसऱ्या चिन्हावर लढणार नाही. त्यांनी असं सांगितलं नाही की, धनुष्यबाणाची की कमळाची ऑफर आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी याबाबत अधिकृतपणे सांगितलं आहे. अशाप्रकारच्या कमळाचा कोणताही प्रस्ताव नव्हता. भाजपची भूमिका स्पष्ट झाली आहे. राज ठाकरे यांनी असं काही म्हटलंही नाही. किंवा त्यांचे प्रवक्तेही बोलले नाहीत”, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.

संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया काय?

शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी याबाबत मोठा खुलासा केला.”राज ठाकरे यांचा प्रवेश नाही तर त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. महायुतीत जो मतदारसंघ शिवसेनेकडे होता त्या मतदारसंघामध्ये राज ठाकरेंच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर लढावं, असा प्रस्ताव आम्ही राज ठाकरेंना दिला होता. त्यांनी त्या प्रस्तावाला नकार दिला. राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की, मी माझं चिन्ह हे कमवलेलं आहे. त्यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मनसेसाठी दक्षिण मुंबईची जागा निश्चित होती”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.