मुंबई : हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे, असं विधान करणं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भोवणार असल्याचं चित्रं आहे. संजय राऊत यांच्या या विधानाचे विधानसभेत पडसाद उमटले आहेत. राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी विधिमंडळ नाही, चोर मंडळ असा शब्द प्रयोग केला. ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ. चोर मंडळ. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो, असं संजय राऊत म्हणाले होते.
संजय राऊत यांच्या या विधानाचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार यांना राऊत यांच्या या विधानाकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान होत आहे. हा केवळ महाराष्ट्राचा अपमान नाही. हा महाराष्ट्र द्रोह आहे. महाराष्ट्राबाबत ही भावना असेल तर ठाकरे गटाच्या आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. या सभागृहात दाऊद आहे का? या सभागृहात बसलेल्यांना चोर म्हणताय. तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. बोटचेपी भूमिका घेऊ नका. विधिमंडळाच्या अपमानाबाबत अशी भूमिका घेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.
संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. संजय राऊत हे भरकटले आहेत. राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे डिक्शनरीतून रोज नवा शब्द शोधून काढून बोलत आहेत. त्यांच्या तोंडाला करवंदीचा काटा लावला पाहिजे. आता आम्ही त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करतोय, असं गोगावले म्हणाले.
राऊत यांनी जो विधिमंडळाचा अपमान केला त्याबाबत मी हक्कभंगाची सूचना दिली आहे. त्यांनी विधिमंडळ नव्हे चोरमंडळ आहे. त्यांनी सरळ म्हटलं आहे. त्यांनी गुंड मंडळ म्हटलं. या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपासूनची उज्जवल परंपरा आहे. तरीही तुम्ही चोरमंडळ म्हणता. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आपण आजच्या आज हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा. त्यावर तातडीने सुनावणी करा आणि बोलणाऱ्यांना शिक्षा करा, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.