मुंबई: भाजपने राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला आहे. संभाजी छत्रपती यांना कशा प्रकारे फसवलं होतं हे यातून स्पष्ट झालं आहे. भाजपला (bjp) स्वत:चा उमेदवार द्यायचाच होता. घोडेबाजार करायचाच होता. यासाठी संभाजी छत्रपतींची (sambhaji chhatrapati) ढाल करण्याचा प्रयत्न झाला. ठीक आहे. लोकशाही आहे. प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करून अशा पद्धतीने निवडणुका लढणार असेल तर सरकारचंही सर्व घडामोडींवर लक्ष आहे, असा सूचक इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला. तसेच, आम्हाला खात्री आहे. जेवढी मते विजयासाठी हवी आहेत, तेवढी मते आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही दोन्ही जागा जिंकू. महाविकास आघाडीचेही उमेदवार विजयी होतील. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. राज्यसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. त्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. काँग्रेसच्या अंतर्गत नाराजी विषयी मी बोलणार नाही. कोणत्या विषयावर नाराजी आहे हे त्यांचे हायकमांड बघतील. काँग्रेसची जी अवस्था आहे. त्यातून ते कमी लोकांनाच राज्यसभेवर पाठवू शकतात. काँग्रेस पक्षाने जिथे जिथे सोय करता येईल तिथे सोय लावली आहे. हा काँग्रेसचा निर्णय आहे ते बघतील. महाराष्ट्रातून स्थानिक उमेदवार दिला असता तर अधिक बळकटी मिळाली असती. पण काँग्रेसने राष्ट्रीय स्तराचा विचार केला असावा. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी काही अभ्यासू लोकांना पाठवायचं ठरवलं असेल. पण हा त्यांचा प्रश्न आहे, असं राऊत म्हणाले.
काँग्रेस नेते सरकारवर नाराज असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. आरोपात तथ्य वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा होत असते. एखादी मोठी गोष्ट असते तेव्हा उद्धव ठाकरे हे थेट सोनिया गांधीना फोन लावून चर्चा करतात. मुख्यमंत्र्यांवर कोणतीही प्रेशर टॅक्टिस चालत नाही. काँग्रेस नेते अशोच चव्हाण, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांची सातत्याने मुख्यमंत्र्यांशी चर्चा होत असते, असंही त्यांनी सांगितलं. निधी बाबत शिवसेनेचे नेतेही नाराज असतात. त्यांच्याशीही मुख्यमंत्री चर्चा करतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.