मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पड्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींमागे महत्त्वाची कारणे आहेत. ती कारणं लवकरच समोर येतीलच. पण सध्या नेमकं काय सुरु आहे, ते समजून घेणं जास्त जरुरीचं आहे. मुंबईत भाजपच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी दाखल होत त्यांची भेट घेतली आहे. यावेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार हे नेते देखील उपस्थित होते.
जे पी नड्डा यांची ही भेट जास्त महत्त्वाची आहे. कारण राज्यात सत्तांतर होऊन जवळपास वर्ष पूर्ण होत आहे. तरीही राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप पार पडलेला नाही. शिवसेना आमदारांची मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी आहे. त्यामुळे जे पी नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबईत आगामी काळात महापालिका निवडणुका देखील पार पडणार आहेत. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक यश मिळेल आणि मुंबईचा महापौर होईल, असं जे पी नड्डा आज मुंबईत आपल्या भाषणात म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकून येण्यासाठी भाजप संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आल्याचं बोललं जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराची तारीख जे पी नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर जाहीर केली जाऊ शकते. कदाचित त्यासाठीच जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर आले असल्याची चर्चा आहे.
सुप्रीम कोर्टाचा निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तारासंबंधीच्या घडामोडींना वेग येईल, अशा चर्चांना उधाण आलं होतं. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर खरंच सत्ताधारी पक्षांच्या गोटात हालचाली वाढलेल्या आहेत. विस्ताराला आता काहीच अडचण नाही, असं आमदारांचं मत आहे. त्यानंतर जे पी नड्डा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह इतर नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार खरंच पार पडतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.