मुंबई : “सध्या महाराष्ट्रात भयानक परिस्थिती आहे. एकीकडे महामारी तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रावर ओढावली आहे. राज्यातील सरकार ‘शिवशाही’ नसून ‘शवशाही’ बनलं आहे,” अशी टीका भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी केली. वसंत स्मृती, दादर येथील मुंबई भाजप कार्यालयात आज (23 जुलै) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्या अपयशावर प्रकाश टाकताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले, “देशातील कोरोना मृत्यूच्या एकूण मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुंबई शहरात सर्वाधिक मृत्यूंची संख्या आहे. असे असतानाही मिडीयाला गुंडाळून बेस्ट सीएम, बेस्ट महापालिकाचं अवॉर्ड मिळवण्यात मुख्यमंत्री व्यस्त आहेत.”
मुंबई महानगरपालिकेत सध्या सरसकट भ्रष्टाचार सुरू असल्याचाही आरोप प्रेम शुक्ला यांनी केला. “विकासकामांवर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करूनही मुंबई दरवर्षी पावसात तुंबतेच. नाल्यांच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करूनही अद्यापही या सरकारला पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करणारी योग्य यंत्रणा तयार करता आलेली नाही. सध्याचे सरकार आणि मुंबई महानगरपालिका काही मोजक्या ठेकेदारांना फायदा मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत,” असा आरोप शुक्ला यांनी केला.
शुक्ला म्हणाले, “महाराष्ट्र सरकार गृहमंत्र्यांसाठी दरमहिना करोडो रुपये मुंबई पोलीस विभागातूनच उकळत आहे. यासंदर्भात सीबीआय चौकशी करीत असून चौकशी थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या फेऱ्या मारत आहे.”
“कोरोना काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू संख्येची अफरातफरी करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची खरी संख्या सरकार लपवत आहे,” असा आरोप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारवर केला. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यासह भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मीडिया प्रमुख श्वेता परुळकर उपस्थित होते.