राजकीय भूकंपाच्या चर्चांनंतर भाजपचं मोठं पाऊल, ‘तो’ व्हिडीओ थेट डिलीट

| Updated on: Oct 27, 2023 | 10:17 PM

भाजपकडून आज संध्याकाळी एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विरोधकांना टीका करायला तर आयतं कोलीतच सापडलं. या व्हिडीओवर सत्ताधारी पक्षांकडून सारवासारवची भूमिका घेण्यात आली. त्यानंतर अवघ्या 55 मिनिटात तो व्हिडीओ डिलीट करण्यात आला. पण त्यावरुन सुषमा अंधारे यांनी खोचक शब्दांत निशाणा साधलाय.

राजकीय भूकंपाच्या चर्चांनंतर भाजपचं मोठं पाऊल, तो व्हिडीओ थेट डिलीट
देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला. पण या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण भाजपकडून जो व्हिडीओ ट्वीट करण्यात आला होता त्यामध्ये देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ ही कविता बोलताना दिसत होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवा भूकंप घडून येणार का? देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या. याबाबत चर्चांना प्रचंड उधाण आल्यानंतर अवघ्या 55 मिनिटांत भाजपला तो व्हिडीओ डिलीट करावा लागला आहे.

देवेंद्र फडणवीस 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी विधी मंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत एक कविता म्हणाले होते. मी पुन्हा येईन, अशी कविता फडणवीस विधानसभेत म्हणाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून येईन, असं देवेंद्र फडणवीस कवितेतून म्हणाले होते. पण निवडणुकीनंतर काय-काय घडामोडी घडल्या ते सर्वश्रूत आहेत. राज्यात आता महायुतीचं सरकार आहे. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसून उपमुख्यमंत्री आहेत. फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी राज्यातील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे.

55 मिनिटात भाजपकडून व्हिडीओ मागे

राज्यात गेल्यावर्षी सत्तांतर झालं. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरुन सध्या विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्याचा निकाल आगामी काळात समोर येऊ शकतो. पण त्याआधीच फडणवीसांचा मी पुन्हा येईन बोलतानाचा व्हिडीओ भाजपच्या अधिकृत अकाउंटवर ट्विट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या व्हिडीओबाबत चर्चांना उधाण आल्यानंतर अवघ्या 55 मिनिटात भाजपकडून हा व्हिडीओ मागे घेण्यात आला.

‘दिल्लीवरून फोन आला का?’, सुषमा अंधारे यांचा सवाल

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणावर टीका केली आहे. “अवघ्या 55 मिनिटात ट्वीट डिलीट झालं. दिल्लीवरून फोन आला का? असं काय घडलं की ट्विट डिलीट करावं लागलं? देवेंद्र फडणवीसांच्या टीमकडून मी कसा पर्याय आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र ते राज्यातील परिस्थिती हाताळायला नापास ठरले आहेत. ट्वीट डिलीट झालं हे राज्यातील भाजपला आवडलेलं नसावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शह-कटशहाचं राजकारण चाललं आहे. टॉम अँड जेरीचा खेळ चालला आहे.