मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah)यांच्या मुंबई दौऱ्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाला त्यांनी मुंबई महापालिका जिंकण्याचे मिशन (Mission BMC election)दिले आहे. दोन्ही पक्षांनी मिळून 150 जागा जिंकण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. या त्यांच्या टीकेवर आणि टार्गेटवर शिवसेनेनेही पलटवार केला आहे. भाजपाकडे नेहमीच कुठले ना कुठले मिशन असते, मात्र जनतेच्या मूळ समस्यांपासून ते मिसिंग (missing)असतात, अशी टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होईल, असेही त्यांनी यावेळी ठासून सांगितले आहे.
अरविंद सावंत म्हणाले की – भाजापाचे सगळे मिशनच असते. आज काय लोटस मिशन उद्या काय दुसरे मिशन, पण जे खरे प्रश्न आहेत त्यापासून ते मिसिंग असतात. अशी टीका त्यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की – अनेक प्रश्न त्यातही जनतेच्या प्रश्नांपासून भाजपा दूर आहे. मराठी माणसांच्या अस्मितेपासून भाजपा दूर आहे. मुंबई महापालिकेवर असलेला शिवसेनेचा भगवा झेंडा कुणीही हलवू शकत नाही. मुंबईतील जाती पाती, सर्व धर्मीय माणसे यांना मुंबईत शांतता हवी आहे. मुंबई शहरात शिवसेनेने निर्माण केलेली व्यवस्था, दिलल्या सुविधा हे मतदार विसरणार नाहीत, असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत राहणाऱ्या मुंबईकरांना पिण्याचं पाणी 24 तास देण्याचं कामही शिवसेनेने केलं आहे. याची आठवणही त्यांनी करुन दिली
दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. शिवाजी पार्क हे शिवसैनिकांसाठी शक्तीस्थळ आहे. तिथूनच शिवसैनिकांना घोषणा मिळाल्या, विचार देण्यात आले. तिथूनच आंदोलन पेटली. तिथूनच देशाला दिशा देण्याचे काम करण्यात आले. तिथे झालेल्या शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचा आवाज आजही शिवसैनकांच्या कानात घुमतो. म्हणून ती जागा आणि तो दिवस हा पूर्णपणे शिवसेनेचाच आहे. सीमोल्लंघन हे शिवसेनेचंच होणार, असं सांगत अरविंद सावंत यांनी दसरा मेळावा हा शिवाजी पार्कात शिवसेनेचाच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.