विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 13 मार्च 2024 : भाजपकडून आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे असणार असल्याची चर्चा आहे. पण ही यादी जाहीर होण्याआधीच मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये उत्तर मुंबई मतदरासंघाचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक आणि मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या खासदार पूनम महाजन यांच्या नावाचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरु आहे. पण आता भाजपच्या हायकमांडकडून अंतिम निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या तीनही खासदारांची धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे मुंबईत गोपाळ शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढू लागली आहे. गोपाळ शेट्टी यांचं खासदारकीचं तिकीट कापलं जाऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. असं असताना सूत्रांकडून मोठी बातमी मिळत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषत: आता मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. कारण भाजपच्या हायकमांडने मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी आणि खासदार मनोज कोटक यांना फोन केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीचं तिकीट दिलं जाणार नाही, असं भाजपच्या हायकमांडने गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांना सांगितल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे. असं असलं तरीही पूनम महाजन यांच्या तिसऱ्या जागेबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्हाला तिकीट दिलं जाणार नाही, अशी सूचना भाजप हायकमांडकडून गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांना करण्यात आली आहे. तसेच जो उमेदवार असेल त्याच्यासाठी प्रचार करा आणि त्याच्यासाठी काम करा, असा आदेशही देण्यात आला आहे. दरम्यान, पूनम महाजन यांच्या जागेवर तिसरा उमेदवरा असेल का? याबद्दलची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण पूनम महाजन यांचंसुद्धा तिकीट कापलं जाऊ शकतं, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत आता भाजपचं हायकमांड अंतिम निर्णय काय घेतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.