केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह यांच्या स्वागताचे संपूर्ण मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात मोठे होर्डींग आणि बॅनर लावण्यात आले आहेत. शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आलं आहे. अमित शाह यांनी आज सर्वात आधी दादरच्या स्वामी नारायण इथल्या योगी सभागृहात येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाषणापूर्वी कार्यकर्त्यांना दम भरल्याची माहिती समोर येत आहे. कार्यकर्त्यांनी भाषणाचा कोणताही व्हिडीओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड करु नये, यासाठी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना भाषणाच्या सुरुवातीलाच दम दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
“मी कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत मजल मारली. म्हणून मी जेव्हा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतो तेव्हा मला खूप आनंद होतो. काही निवडणूक या देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. माझ्या अनुभवावरून सांगतोय. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल. ६० वर्षांत कुठलाही राजकीय पक्ष सलग तीन वेळा जिंकलेला नाही”, असं अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले.
“राहुल गांधींनी किती निवडणूक जिंकल्या? एका परीक्षेत ९० टक्के गुण मिळालेला विद्यार्थ्याला ८५ टक्के गुण मिळाले. पण २० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला ३० टक्के मिळाले. तरीही ३० टक्के मिळालेला विद्यार्थी गावात मिठाई वाटतो. हा मूर्खपणा आहे. आपण राजकारणात आहोत. जो सरकार बनवतो तोच विजयी. निराशेला गाडून कामाला लागा. मी शब्द देतो. महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार तयार करेल”, असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं.
“लोकसभेत फक्त २ जागा आल्या तरी एकही कार्यकर्ता आपला पक्ष सोडून गेला नव्हता. हा आपला इतिहास आहे. ८०च्या दशकातील कार्यकर्त्यांना माहिती होते आपण निवडणूक हरणार आहोत. तरीही काळजी नव्हती. आपण राजकारणात महान भारताच्या रचनेसाठी आलो आहोत. पंतप्रधान किंवा कुठल्याही पदासाठी नव्हे. सरकार येते आणि जाते. पक्ष नीती आणि विचार सोडतात. आपले सरकार १० वर्षे चालले. पण आपण विचार किंवा निती सोडली नाही”, असा दावा अमित शाह यांनी केला.
“काश्मीर आपलं आहे हे विरोधात असतानाही आपण बोलत होतो. तेव्हा आपले सरकार येईल असे कुणाला वाटले होते का? पण आपले सरकार आले आणि कलम ३७० आपण हटवले. राम मंदिर होईल असे कुणाला वाटले होते का? पण भूमिपूजन नव्हे तर मंदिर पण तयार केले. आज जय श्रीराम हक्काने बोलत आहेत, असं अमित शाह म्हणाले.
“मी देशभर फिरत आहे. सर्वीकडे विचारत नाही की झारखंड किंवा हरयाणा येथे काय होणार? महाराष्ट्रात काय होणार एवढेच विचारत आहेत. मी महाराष्ट्राला विचारतो, काय होणार?”, असा सवाल अमित शाह यांनी केला. त्यावर कार्यकर्त्यांनी “आपण जिंकणार”, असं म्हटलं. त्यावर अमित शाह पुन्हा विचारतात, “सरकार तयार होणार का?”, त्यावर कार्यकर्ते “आपले सरकार तयार होणार”, असं उत्तर देतात.