मुंबई | दि. 5 मार्च 2024 : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पाच आणि सहा मार्च रोजी अमित शहा मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अकोल्यात असणार आहे. अमित शाह जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. सुरुवातीला अकोला त्यानंतर जळगाव आणि संध्याकाळच्या सत्रात संभाजीनगरमध्ये अमित शाहांची जाहीर सभा होणार आहे. परंतु या दौऱ्यास सर्वात महत्वाचा प्रश्न अमित शाह निकाली लावणार आहे. महायुतीचे जागावाटप अमित शाह सोडवणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जास्त जागा मागितल्या गेल्यामुळे भाजपसमोर अडचण निर्माण झाली आहे. त्यावर आता अमित शाह तोडगा काढणार आहे.
मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह बैठका घेणार आहेत. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या बैठका होणार आहेत. त्या बैठकांवर पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यात सर्वात महत्वाचा विषय महायुतीचा जागा वाटपाचा आहे. हे जागा वाटप न झाल्यामुळे भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केली नाही.
महायुतीत जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. महायुतीत भाजपने ३० ते ३२ जागा लढवाव्यात, असे केंद्रीय नेत्यांचे मत आहे. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून एकूण ३८ जागा मागितल्या गेल्या आहेत. त्यामुळे भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. आता मित्रपक्षांची मागणी कमी करुन भाजप ३० जागा आणि उर्वरित मित्रपक्ष १८ जागा लढवण्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न अमित शाह करणार आहे. त्यासाठी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार नव्हता. आता दुसरी यादी ६ मार्च रोजी येण्याची शक्यता आहे. यामुळे त्यापूर्वी जागा वाटप निश्चित करण्याचा अमित शाह यांचा प्रयत्न आहे. यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांचे जागा वाटप आजच निश्चित होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे सायंकाळपासूनच शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अमित शहा यांची सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री संदिपान भुमरे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,पंकजा मुंडे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि आमदार या सभेला हजर असतील.