‘आदित्य ठाकरे निर्बृद्धपणे बोलले, त्यांना मी ट्युशन द्यायला तयार’, भाजप नेत्याचे टोमणे

| Updated on: Apr 15, 2023 | 8:23 PM

"आदित्य ठाकरे यांच्याकडे अपेक्षा होती की ते अभ्यास करुन बोलतील. पण ते निर्बृद्धपणे बोलले. त्यांचं बोलणं ऐकल्यावर त्यांना प्राथमिक शाळेत पाठवावं लागेल, असं वाटतं", अशा खोचक शब्दांत भाजपच्या बड्या नेत्याने टीका केलीय.

आदित्य ठाकरे निर्बृद्धपणे बोलले, त्यांना मी ट्युशन द्यायला तयार, भाजप नेत्याचे टोमणे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या टीकेवर आता भाजपकडून आमदार आशिष शेलार यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “आदित्य ठाकरेंचं धोरण म्हणजे अहंकारी धोरण आहे. आरेत कारशेड झाल्यामुळे आपल्याला मेट्रो मिळतेय. तुमच्या अहंकारामुळे मेट्रो मिळाली नसती. आदित्य ठाकरेंना ट्युशन द्यायला मी तयार आहे. राजकारणापोटी मुंबईकरांचं दररोज साडेपाच कोटींचं नुकसान पिता-पुत्राने केलं आहे”, असा गंभीर आरोप शेलारांनी केला. तसेच आमच्यामुळे हा वाढीव खर्च वाचणार आहे, असा दावा त्यांनी केला.

“आदित्य ठाकरे यांच्याकडे अपेक्षा होती की ते अभ्यास करुन बोलतील. पण ते निर्बृद्धपणे बोलले. त्यांचं बोलणं ऐकल्यावर त्यांना प्राथमिक शाळेत पाठवावं लागेल, असं वाटतं. मेट्रो ३ किंवा ६ प्रकल्प असेल कारशेड करा ही भूमिका आदित्य ठाकरेंची, त्यानंतर सौनिक समिती नेमली गेली. त्याचा अहवाल स्पष्टपणे सांगत होता की, मेट्रोचं कारशेड आरेमध्ये करणं सोयीस्कर ठरेल. आरेवर कारशेड करण्याचा खर्च वेगळा आणि इंटिग्रेटेड करायचा खर्च वेगळा आहे. यात शहानपणा कुठून आला?”, असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

‘अमित शाह म्हणजे तुफान’

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यासाठी येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात जोरदार तयारी सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: अमित शाह यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर गेले आहेत. याबाबत आशिष शेलार यांना प्रश्न विचारला असता, “केंद्रीय अमित शाह म्हणजे तुफान. बिळातून काही प्राणी आता कुई कुई करण्याचा प्रयत्न करतील”, असा टोला त्यांनी लगावला. तसेत अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं आशिष शेलार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यावेळी आशिष शेलार यांना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी राऊतांवर टीका केली. “संजय राऊतांनी राष्ट्रवादीच्या म्हणजेच दुसऱ्यांच्या घरात वाकून बघण्याची सवय बंद करावी. स्वत:च्या घरात लक्ष द्यावं. राहिलेली थोडीशी वाचेल”, असा टोला त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांचा नेमका दावा काय?

“महसूल खात्याने सांगितलंय की, मेट्रो लाईन 6 साठी कांजूरमार्गच्या जागेतील 15 हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत केली जावी. मला वाटतं, ही बातमी मुंबईच्या दृष्टीकोनातून फार मोठी आहे. आम्ही सातत्याने बोलत आहोत. लाईन 6 साठी कारशेड गरजेचं आहे. याबाबतचं टेंडर कारशेडविना 2018 मध्ये काढण्यात आलं. नंतर कारशेड बनवणार कुठं? हा मोठा प्रश्न होता. 2020-21 च्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कारशेड कांजूरमार्गला हलवलं होतं. लाईन 6, 3, 14, 4 या चार लाईनचे डेपो एकाच ठिकाणी करणार होतो. जनतेचे पैसे वाचावे, वेळ वाचावे यासाठी प्रयत्न सुरु होते. यातून दहा ते साडे दहा कोटी रुपये आपण महाराष्ट्राचे वाचवले असते. याशिवाय वेळ वाचवला असता”, असा दावा आदित्य ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.