मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर भाजप नेते आणि राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केलीय. “राज्यातील राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय बनला आहे”, असं मत त्यांनी मांडलंय. अब्दुल सत्तार यांनी काल सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवराळ भाषा वापरली होती. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलंय.
“राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झालाय. सगळ्या पक्षांनी एकत्र बसून याची एक आचारसंहिता तयार करायला हवी. कसं वागायला पाहिजे याची आचारसंहिता तयार व्हायला हवी. कुणीतरी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य चर्चेचा विषय आहे. त्यांच्या प्रतिक्रियेवर त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर आलीय”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या शिवराळ भाषेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान चुकीचं असल्याचं म्हटलंय. तसेच कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. अब्दुल सत्तारांचं आपण समर्थन करत नाही. ती चूकच आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडलीय.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील अब्दुल सत्तार यांना त्यांच्या वक्तव्याप्रकरणी समज दिल्याची माहिती समोर आलीय. माध्यमांसोबत बोलताना जबाबदारीने बोला. तसेच जबाबदारीने वागा. यापुढे अशाप्रकारचे वक्तव्य नकोत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना समज दिल्याची बातमी समोर आलीय.