मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज बीडमध्ये गोपीनाथ गडावरुन धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे नेमका कुणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये आपली रोखठोक भूमिका मांडल्यानंतर इकडे मुंबईतही घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे बडे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सर्व आमदार-खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीचा आणि पंकजा मुंडे यांचा काही संबंध आहे का? याबाबत तशी काही माहिती मिळालेली नाही. पण आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय.
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. कारण पावसाळ्यानंतर लगेच राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई महापालिकेचा देखील समावेश आहे. मुंबई महापालिकेवर ताबा मिळवणं ही भाजपची सर्वात मोठी महत्त्वकांक्षा आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून या महापालिकेवर शिवसेनेचा ताबा आहे.
सध्या परिस्थिती वेगळी आहे. कारण शिवसेनेत फूट पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना भाजपसोबत आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला डिवचण्यासाठी भाजपला मुंबई महापालिकेवर ताबा मिळवायचा आहे. याचसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रचंड कामाला लागले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सर्वात महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सर्व आमदार, खासदार, विधानपरिषदेचे आमदार आणि लोकसभेच्या खासदारांना बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
खरंतर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. ठाकरे गटात तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. तसं असलं तरी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काही दिवसांसाठी परदेशात गेल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे मुंबईत असताना त्यांच्या सातत्याने आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु होत्या. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्ष वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. दररोज त्यांच्या पक्षात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम पार पडत आहेत.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला एकटं पाडण्यासाठी किंवा पराभव करण्यासाठी भाजपकडून मनसेला देखील जवळ केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याची चर्चा आहे.