अजित पवार यांचं भाषण सुरु होताच देवेंद्र फडणवीस निघून गेले, नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 01, 2023 | 6:05 PM

महायुतीची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीवेळी अजित पवार यांचं भाषण सुरु झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मंच सोडून बाहेर गेले. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. अखेर काही वेळाने फडणवीस पुन्हा आले. त्यांनी आपल्या भाषणात याबाबत स्पष्टीकरण दिलं.

अजित पवार यांचं भाषण सुरु होताच देवेंद्र फडणवीस निघून गेले, नेमकं काय घडलं?
Follow us on

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी कोणताही निर्णय घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचीही तिथे स्वाक्षरी लागेल, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतिम स्वाक्षरी नंतर तो निर्णय अंमलात येईल, असा नियम शिंदेंनी बनवला. याशिवाय अजित पवार यांनी साखर कारखान्यांबद्दल काढलेला जीआर देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करत नवा जीआर काढला. कारण त्या जीआरमुळे भाजपचे अनेक नेते अडचणीत आले होते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

या दोन घटनांमुळे महायुतीत एकमेकांवर कुरघोडी केली जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीरपणे भाष्य केलं. महायुतीची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. “अजित दादा बोलायला उभे राहिले आणि देवेंद्र फडणवीस निघून गेले, अशाप्रकारची बातमी होऊ नये यासाठी मी स्पष्टीकरण देतो. नेवीचे चीफ महाराष्ट्रात आले होते. आपण डिफेन्स मॅनिफॅक्चुरिंगसाठी त्यांची वेळ मागितली होती. नेमकी त्यांची वेळ साडेतीनची आल्यामुळे मी 15 मिनिट त्यांची वेळ घेऊन परत आलो”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

‘ही फेविकॉलची जोड आहे’

“आताच्या परिस्थितीत आपल्या विरोधकांच्या माध्यमातून एकच गोष्ट चालली आहे. तुम्ही कुणाची मनधरणी करु शकणार नाही तर त्यांना गोंधळात टाका, असा विरोधकांचा प्रयत्न सुरु आहे. एक विसंवाद तयार करण्याचा प्रयत्न, कुठेतरी वाद सुरु आहे, असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण एक गोष्ट निश्चितपणे आपण समजून घेतली पाहिजे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व मित्रपक्ष सर्वांची फेविकॉलची जोड आहे ती सहजासहज तुटणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘आमच्यात पूर्ण संवाद’

“पेपरमध्ये कधीतरी वाचायला मिळतं याने त्याच्यावर कुरघोडी केली, याने त्याच्या संदर्भात असं सांगितलं. तुम्ही त्यांची काळजी करु नका, मुख्यमंत्री, मी आणि अजित दादा आमच्यात पूर्ण संवाद आहे. पूर्ण एका विचाराने आणि एका दिशेने आम्ही चाललो आहोत. सर्व निर्णय एकत्रितपणे घेतोय. शंभर टक्के समन्वय आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आमची परिस्थिती इंडिया आघाडीसारखी नाही. या मंचावर आलेल्या कुणालाही प्रश्न पडला नाही की माझी जागा कुठे आहे. समोर बसलेले दिग्गजांनाही वाटलं नाही की आपली जागा कुठे आहे?”, अशी टीका फडणवीसांनी केली.

फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

“36 विरोधक एकत्र आले आहेत. यापैकी अर्धे असे आहेत की, त्यांचं काही अस्तित्व नाहीय. पण या 36 लोकांना माझा एकच प्रश्न आहे, तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे ते सांगा. आमच्या सर्वांचा उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. ते आजही पंतप्रधान आहेत आणि उद्याही आहेत. पण इंडिया आघाडीने सांगावं”, असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

“आतापर्यंत पाच पक्षांनी दावा ठोकलाय. राहुल गांधींचं कुणी नावच घ्यायला तयार नाही. दोन दिवस यांनी बैठक केली त्यानंतर त्यांनी जे प्रसिद्धी पत्रक तयार केलाय त्यामध्ये म्हटलंय की, आम्ही असा निर्णय घेतलाय आम्ही शक्य तितकं एकत्र निवडणूक लढवू. म्हणजे इंडिया आघाडीची आजच भेंडी आघाडी झालीय”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.