मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रविवारी खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) सडकून टीका करत निशाणा साधला. त्यांच्या या आक्रमक भाषणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून खिल्ली उडवण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या सभेतून काहीही नवीन मिळालेलं नाही. ते तेच तेच बोलले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“तेच शब्द, तीच वाक्य, तेच टोमणे, काहीही नवीन या सभेमधून मिळालं नाही. खरं म्हणजे त्यांच्या नाकाखालून 40 लोकं निघून गेल्याचा संताप आणि निराशा, या दोन्ही गोष्टींमुळे त्यांच्या भाषणामध्ये केवळ हताशा आपल्याला पाहायला मिळत होती. त्या व्यतिरिक्त त्यात काहीही नव्हतं. त्यामुळे अशा हताश भाषणावर आणि टोमण्यांवर कुठलीही प्रतिक्रिया देणं मी योग्य समजत नाही”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “आता त्यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैनही पडत नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. “त्यांच्याकडून नेहमी शिवसेना-भाजप महायुती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याचा एकच कार्यक्रम सुरु आहे. त्यांना आरोप करु द्या”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देशभक्ताची उपमा देऊ नये, एवढंच मला सांगावसं वाटतं. तेही असं करायला मागे-पुढे पाहणार नाहीत. कारण महाराष्ट्रात जो बदल घडलाय, केंद्र आणि राज्य सरकारडून विकासाची जी कामे सुरु आहेत त्यामुळे अतिशय पोटदुखी सुरु झालेली आहे. त्याचाही इलाज आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.
“दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय. आमचं काम पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरलेली आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीचा एका विजयाने ते एवढे हुरळून गेले आहेत की त्यांना वाटतं की आता राज्य आणि देशामध्ये बदल घडेल. पण त्याचबरोबर तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला हे त्यांना दिसत नाही. यापूर्वीदेखील बदलाचे वारे वाहून गेले असा अंदाज व्यक्त केला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा महायुतीला विजय मिळेल आणि सर्व विरोधकांचा धुव्वा उडेल”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.