मुंबई: गेल्या वर्षभरात कोकणाला तिसऱ्यांदा नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे. त्यामुळे आतातरी सरकारने कोकणाला मदत द्यावी, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक भागांमध्ये सध्या पूरपरिस्थिती (Flood situation) निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोकणातील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षभरात कोकणाला बसलेला हा तिसरा फटका आहे. यापूर्वी निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळावेळी राज्य सरकारने कोकणाला मदत केली नाही. किमान आतातरी मदत द्यावी. तसेच आवश्यक त्या सर्व यंत्रणा मदतीसाठी तयार ठेवाव्यात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
सिंधुदुर्गात सकाळ पासून मुसळधार पाऊस लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.सकाळी सकाळीच संततधार असणाऱ्या पावसाने नंतर जोरदार बॅटिंग करत जिल्ह्याला झोडपून काढले.जिल्ह्यातील नदी,नाले,ओहोळ यांना पूर आला असून यावरून जाणारे जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्यामुळे बंद झाले आहेत. सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून काही भागात शेती ही पाण्याखाली गेली आहे.नदी कडील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला असून अतिवृष्टीमुळे झाडे ही कोसळून पडली आहेत.
कणकवली व वैभववाडी तालुक्यात अतीमुसळधार पाऊस लागला असून काही घरे आणि गोठ्यांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बसस्थानकाला ही पाण्याचा वेढा पडला आहे.गेले तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होता. मात्र आज मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आहे.या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गवासीयांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.तूर्तास पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. पण आणखी असाच मुसळधार पाऊस पडत राहिला तर याहून ही भयंकर परिस्थिती उदभवू शकते.
रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले असून 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर (Flood) आला आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.
चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. पाणी वाढण्याचा वेग मोठा आहे.
संबंधित बातम्या:
Mahad Rain | सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी, महाड शहरात 6 ते 7 फूट पाणी
VIDEO : Chiplun Rain Update | चिपळूणच्या हाहा:काराची 10 दृश्य
(BJP leader Devendra Fadnavis on flood situation in Konkan Region)